पंढरपूरमधील स्थानिक निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला डावलून विरोधकांना मदत केल्याचा आरोप केला जात आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले यांनी केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पंढरपूर तालुक्यातील सरकोली गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वर्षा दीपक भोसले यांनी निवडणूक लढवली होती. पक्षाने त्यांना अधिकृत 'एबी फॉर्म' (AB Form) देखील दिला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि तिथे स्थानिक आघाडीचा उमेदवार निवडून आला.
(नक्की वाचा- Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
"स्वतःच्या राजकारणासाठी पक्षाला फसवले"
दीपक भोसले यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार अभिजीत पाटील यांनी केवळ स्वतःच्या राजकारणासाठी आपल्या पत्नीला घड्याळ चिन्ह देऊनही, पडद्यामागून भालके यांच्या स्थानिक आघाडीच्या उमेदवाराला मदत केली," असा दावा भोसले यांनी केला आहे. आमदारांच्या या दुटप्पी भूमिकेमुळेच आमचा पराभव झाला असून, या प्रकरणाची थेट तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(नक्की वाचा- Nagpur Police Bharti: डॉक्टर, इंजिनिअर अन् फॅशन डिझायनर; पोलीस भरतीच्या रांगेत उच्चशिक्षितांची मोठी गर्दी)
"पाठीत खंजीर खुपसल्यासारखे राजकारण"
दीपक भोसले यांनी आपल्या आक्रमक प्रतिक्रियेत म्हटले आहे की, आमदार पाटील यांचे राजकारण हे विश्वासघातकी आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार असतानाही इतर उमेदवारांना रसद पुरवणे हा पक्षाशी द्रोह आहे. या आरोपांमुळे आता अजित पवार गट आमदार अभिजीत पाटील यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.