Nagpur Police नागपूर पोलीस दलातील भरती प्रक्रियेतून रोजगाराच्या भीषण वास्तवाचे आणि सरकारी नोकरीप्रती असलेल्या आकर्षणाचे एक नवे चित्र समोर आले आहे. केवळ 12 वी उत्तीर्ण पात्रता असलेल्या शिपाई पदासाठी चक्क डॉक्टर आणि इंजिनिअर्सनी धाव घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नागपूर पोलीस दलात सध्या शिपाई (कॉन्स्टेबल) पदासाठी भरती प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे. मात्र, या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहून पोलीस प्रशासनही थक्क झाले आहे. किमान पात्रता केवळ 12 वी उत्तीर्ण असतानाही, या रांगेत चक्क BDS डॉक्टर, M.Tech इंजिनिअर्स आणि फॅशन डिझायनर्स खाकी वर्दी परिधान करण्यासाठी घाम गाळताना दिसत आहेत.
आकडेवारी काय सांगते?
या भरती प्रक्रियेत एकूण 36,222 उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यापैकी पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.
एकूण पदवीधर- 9775
पदव्युत्तर - 1729|
BDS (डेंटल सर्जन)- 1
M.Tech / BE / B.Tech- 504
MBA (व्यवस्थापन)- 127
LLM / Law (कायदा)- 13
विशेष म्हणजे, यामध्ये एक *MCom पदवीधारक ट्रान्सजेंडर* उमेदवार आणि दोन महिला फॅशन डिझायनर्सचाही समावेश आहे.
(नक्की वाचा- Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
भरती प्रक्रियेचे स्वरूप
- पुरुषांसाठी: 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक.
- महिलांसाठी: 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक.
- या मैदानी चाचण्यांनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
(नक्की वाचा- Mumbai News: एका चुकीमुळे घडली मुलुंड मेट्रो दुर्घटना; पोलीस तपासात धक्कादायक बाब आली समोर )
पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया
नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि सह-पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडत आहे. डीसीपी (मुख्यालय) दीपक अग्रवाल यांनी या ट्रेंडचे स्वागत करताना म्हटले, "पोलीस दलात उच्चशिक्षित तरुणांचे येणे हे सकारात्मक चिन्ह आहे. त्यांच्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग आम्ही सायबर क्राईम आणि आधुनिक प्रशासकीय कामात प्रभावीपणे करू शकू."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world