मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा किंवा केंद्रशासित करण्याचा विचार त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, अशा काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ चेतवण्याचे काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरी गीतांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित करुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंड 5, 6 आणि 7 च्या प्रकाशन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली आणि समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या साहित्यात करुणा, संवेदना, क्रांती आणि एक वैश्विकता पाहायला मिळते. त्यांचे साहित्य जगातील 22 भाषांमध्ये अनुवादित झाले असून, अनेक देशांमध्ये ते प्रसिद्ध आहे. तसेच, देशातील विविध विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्यावर संशोधन सुरू आहे. रशियामध्ये त्यांच्या साहित्याचा अभ्यास पाहता अभिमानाने ऊर भरून येतो, असेही ते म्हणाले.
अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, सिनेमा पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट लेखन केले. आपल्या 49 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी 40 पेक्षा अधिक कादंबऱ्या आणि विविध प्रकारच्या रचना लिहिल्या. त्यांच्या साहित्यावर आज हजारो लोक पीएचडी करत आहेत. ते खऱ्या अर्थाने एक चालते बोलते विद्यापीठ होते, असे फडणवीस यांनी सांगितले.
अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनातून त्यांचे व्यक्तिमत्व मोठे झाले. त्यांच्या लेखणीने समाजाला दिशा दिली, सामान्य माणसाला बळ दिले आणि वंचितांचा आवाज बनले. त्यांचे हे कार्य समाजासमोर आणण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचे आराखडेही तयार झाले आहेत. हे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.