Parli Vaijnath Temple : अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या देशातील पाचव्या ज्योतिर्लिंगाची काय आहे आख्यायिका?

कशी आहे परळीच्या वैद्यनाथ मंदिराची (Parli Vaijnath Temple) वास्तू रचना, काय आहेत आख्यायिका? वाचा NDTV मराठीचा विशेष लेख.

Advertisement
Read Time: 4 mins
बीड:

स्वानंद पाटील, बीड

देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांचं (Jyotirlinga in Maharashtra) अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहिलं ज्योतिर्लिंग गुजरातचं सोमनाथ, दुसरं आंध्रप्रदेशचं मल्लिकार्जुन, तिसरं मध्यप्रदेशचं महाकालेश्वर, चौथं मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर, पाचवं महाराष्ट्रातील वैद्यनाथ, सहावं महाराष्ट्रातील भीमाशंकर, सातवं तामिळनाडूतील रामेश्वर, आठवं महाराष्ट्रातील नाथनाथ, नववं उत्तर प्रदेशातील विश्वेश्वर, दहावं महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, अकरावं उत्तराखंडमधील केदारनाथ, बारावं महाराष्ट्रातील घृष्णेश्वर. यावरून लक्षात येईल की 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग (Vaidyanath Temple in Beed) महाराष्ट्रातील आहेत.    

यातील मराठवाड्यातील बीडमधील वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केल्याची माहिती आहे. सर्वसाधारणपणे मंदिरात स्पर्श करून दर्शन घेता येत नाही. मात्र या मंदिरात देवाला स्पर्ध करून दर्शन घेता येतो. परभणीपासून 60 किलोमीटर आणि अंबेजोगाईपासून 25 किलोमीटर अंतरावर वैद्यनाथ मंदिर आहे. 

नक्की वाचा - उनकेश्वर मंदिराचा वाल्मिकी रामायणातही उल्लेख, आजही 'त्या' कुंडातून वाहतो गरम पाण्याचा झरा

कशी आहे परळीच्या वैद्यनाथ मंदिराची (Parli Vaijnath Temple) वास्तू रचना, काय आहेत आख्यायिका, वाचा NDTV मराठीचा विशेष लेख.

देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीडमधील परळी येथे आहे. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. ज्योतिर्लिंग असल्या कारणाने धार्मिक दृष्ट्या या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या ठिकाणी शिवलिंगाच्या स्पर्श दर्शनाचे महत्त्व असल्याने भाविकांचा ओढा नेहमीच पाहायला मिळतो. पुराणांत सुद्धा परळीच्या वैद्यनाथांचा उल्लेख आहे. वैद्यनाथ मंदिराच्या आवारातच  आणखी अकरा ज्योतिर्लिंग मंदिरेही आहेत.

आद्य शंकराचार्यांनी रचना केलेले हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे. या स्तोत्रात स्पष्टपणे 'परल्यां वैद्यनाथंच' असा परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर स्वतः आद्य शंकराचार्यांनी बारा ज्योतिर्लिंग यात्रा केली होती. या यात्रेदरम्यानही ज्योतिर्लिंग म्हणून आद्य शंकराचार्य परळी वैद्यनाथ येथे दर्शन घेऊन, भेट देऊन गेल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. आद्य शंकराचार्य परळी वैजनाथ येथे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आल्याची नोंद श्रृंगेरी येथील शंकराचार्य मूळ पिठामध्ये आजही उपलब्ध आहे.

Advertisement

- आद्य शंकराचार्य स्तोत्र -

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् ।
सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।
हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः ।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून वर्षभरात गुढीपाडवा, विजयादशमी, मकरसंक्रांती, महाशिवरात्री या सणांच्या दिवशी अलंकारिक महापूजेची आरास केली जाते. महाशिवरात्र व दसऱ्यानंतर निघणाऱ्या पालखी सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी होते. महाशिवरात्री आणि श्रावण पर्वत दर्शनासाठी भाविक वर्ग मोठ्या संख्येने परळी वैजनाथ येथे दाखल होत असतो. भाविकांना परळीत येण्यासाठी रेल्वेची सोय असल्याने येथे थेट पोहोचता येते. तसेच अनेक महामार्गही परळीत येतात. 

मान्यतेनुसार परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे 2000 वर्षे जुने आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम करण्यासाठी तब्बल 18 वर्षे लागली आहेत, असं सांगितलं जातं. परळीजवळ असलेल्या त्रिशूला देवी पर्वत रांगेतून काही खास दगड मिळवले. या दगडातूनच जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आले होते. पूर्वेकडे तोंड करून मंदिराला दक्षिण आणि उत्तर दिशांना दोन दरवाजे आहेत. मंदिराच्या परिसरात एक मोठा सागवान लाकडाचा हॉल आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रशस्त प्रदक्षिणा आवार आहे. मंदिराचे सौंदर्य आणखी वाढवणारे दोन तीर्थ आहेत, त्यांनाही धार्मिक महत्त्व आहे. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. त्रिकाल दर्शनामुळे तीन नंदीचे वास्तव्य असल्याने या गाभाऱ्यात तीन नंदी आहेत.

Advertisement

या ज्योतिर्लिंग मंदिराचा स्वत: इंदूरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Rani Ahilyabai Holkar) यांनी जीर्णोद्धार केलेला आहे. ज्योतिर्लिंग एका टेकडीवर असून वर चढण्यासाठी पायर्‍याही बनविल्या आहेत. मंदिराजवळच शिवकुंड बांधलेले आहेत. वैद्यनाथाचे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे,असे म्हणतात. 

नक्की वाचा - वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ? आळंदीच्या इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण, प्रशासनाचं दुर्लक्ष

परळीच्या प्राचीन नावाचे अनेक संदर्भ

वैजनाथ मंदिराभोवती डोंगर जंगल आणि नद्या, उपयुक्त औषधी वनस्पतींनी परिपूर्ण आहेत. म्हणूनच प्राचीन काळात परळीचे एक नाव वैजयंती असे आहे. परळी ज्योतिर्लिंगाला वैजनाथ असेही म्हणतात. येथेच भगवान विष्णूंनी देवांना अमृत प्राप्त करण्यास यशस्वीपणे मदत केली. त्यामुळे या ठिकाणाला 'वैजयंती' असेही म्हणतात. कांतीपूरी असेही परळी वैजनाथ क्षेत्राचे प्राचीन नाव आहे. वैद्यनाथांच्या आरतीत याचा उल्लेख आहे.

Advertisement

स्पर्श दर्शनाचे महत्त्व, इथे पार्वतीसह भगवान शंकराचा निवास

बारा ज्योतिर्लिंगापैकी वैद्यनाथ एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे, ज्याचे स्पर्श दर्शन अतिशय महत्त्वाचे समजले जाते. या ज्योतिर्लिंगात अमृत असल्यामुळे ही आरोग्य प्रदान करणारी देवता आहे, असं मानलं जातं. अमृत व धन्वंतरी दोन्हींचाही वास या शिवलिंगात असल्याने या ज्योतिर्लिंगास वैद्यनाथ नाव प्राप्त झाले आहे. त्यामुळेच परंपरेप्रमाणे या ठिकाणी स्पर्श दर्शनाची रीत आहे. स्पर्श दर्शनाने सर्व बाधा दूर होतात अशी भाविकांची नितांत श्रद्धा आहे.

देव दैत्यांनी केलेल्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली होती. त्यामध्ये धन्वंतरी आणि अमृत ही दोन रत्नं होती. जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले, तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत याच वैजनाथ शिवलिंगात लपवले. राक्षसांनी जेव्हा शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. पण, जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला, तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला. अशी मान्यता आहे की, परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे. अमृतयुक्त असल्यामुळेच या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ आरोग्याची देवता असे म्हणतात.

या मंदिराशी अनेक आख्यायिका जोडलेल्या आहेत.अशीच एक सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे जी परळी येथे घडली असे म्हणतात. मार्कंडेयाला वैद्यनाथाकडून जीवनाचे वरदान मिळाले. ही कथा शिवपुराणातील आहे. त्यांच्या नावावरून परळी वैजनाथ येथील एका तीर्थाला मार्कंडेय तीर्थ नाव देण्यात आले आहे.