राहुल तपासे, सातारा
सातारा जिल्ह्यातून माणुसकीला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास विजेचा तीव्र शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडलेल्या आपल्याच कुटुंबातील मुख्य सदस्याचे प्राण वाचवण्यासाठी धावलेले इतर तीन सदस्यही यात मृत पावले आहेत.
एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब संपले
स्थानिक नागरिकांकडून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ घडला. पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास कुटुंबातील किसन पिसुरड्या शिंदे हे घराबाहेर पडले असता, तिथून गेलेल्या विद्युत वायरमध्ये अचानक आलेल्या जोरदार प्रवाहाचा त्यांना तीव्र शॉक लागला.
(नक्की वाचा- Nitin Gadkari: ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG, आता कचऱ्यावर धावणार बस! इथेनॉलनंतर नितीन गडकरींची मोठी घोषणा)
किसन शिंदे हे विजेच्या प्रवाहात अडकल्याचे पाहताच त्यांना वाचवण्यासाठी घरातील गंगुबाई शिंदे, सचिन शिंदे आणि आरती शिंदे हे तिघेही एकामागून एक मदतीसाठी धावले. मात्र, विजेचा प्रवाह एवढा जास्त होता की, ते तिघेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले आणि चौघांचाही काही क्षणांत जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वीज पुरवठा खंडित केला. फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
(नक्की वाचा- Dombivli News: शिंदे गटाच्या नगरसेवकाची गुंडगिरी; महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण)
महावितरणचा निष्काळजीपणा की अपघात?
घराबाहेरील वायरमध्ये अचानक विद्युत प्रवाह कसा उतरला? ही दुर्घटना नेमकी कोणाच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे घडली? यामध्ये महावितरणचा काही निष्काळजीपणा होता का? या सर्व गंभीर बाबींचा तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. घटनेमुळे मृत शिंदे कुटुंबाच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून या दुर्घटनेबद्दल तीव्र हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world