मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे वडीगोद्रीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषण करत आहेत. अंतरवालीला जाण्यासाठी वडीगोद्रीवरून जावे लागते. पण शनिवारी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आल्याने वातावरण तापले होते. गावात तणाव निर्माण झाला होता. यासाठी खबरदारी म्हणून वडीगोद्रीवरून अंतरवालीला जाणारा रस्ताच पोलिसांनी बंद केला. त्याच फटका मात्र या दोन्ही गावातल्या सर्व सामान्यांना बसत आहे. त्यातूनच थेट पोलिसांबरोबर वाद होत आहे. अशाच वादाचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीमध्ये आरक्षणावरून सर्व वातावरण ढवळून निघालं आहे. याचा फटका मात्र रोज ये जा करणाऱ्या गावकऱ्यांना बसत असल्याचे आता समोर आले आहे. आंतरवालीत जायचं असल्यास वडीगोद्रीवरून जावं लागतं. पण वडीगोद्री इथं सध्या ओबीसीचं आंदोलन सुरू आहे. त्यामुले अंतरवालीत जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे अंतरवालीतील गावकऱ्यांनी फिरून जावं लागतं. त्यातून पोलिसां बरोबर वाद होण्याचे व्हिडीओ ही समोर आले आहेत.
एका तरुणीला अंतरवालीत जायचं होतं. ती त्यावेली वडीगोद्रीत होती. पण पोलिसांनी तिचा रस्ता अडवला. तिला पोलिस सोडायला तयार नव्हते. अशा वेळी त्या तरूणीचा संताप अनावर झाला. ती थेट पोलिसांनाच भिडली. आमचा रोज जाण्याचा हा रस्ता आहे. तुम्ही तो कसा काय अडवू शकता असा प्रश्न तिने पोलिसांना केला. मी कुठल्याही घोषणा दिल्या नाहीत. कोणाला काही बोलले ही नाही. असं असताना तुम्ही माझा रस्ता का अडवता अशी विचारणाही तिने केली.
ट्रेंडिंग बातमी - 'द लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा ट्वीट करत इशारा
यावेळी वडीगोद्रीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तरूणी पोलिसांना चांगलीच भिडली होती. त्यामुळे तिच्या भोवती लोक जमा झाले. अतिरीक्त पोलिसही तिथे आले. सुरक्षेच्या कारणासाठी ही व्यवस्था केल्याचे पोलिस तिला सांगत होते. पण ती काही ऐकण्याच्या स्थिती नव्हती. कारण ही तसेच होते. तिला वळसा मारून आंतरवाली गाठावे लागणार होते. हा नाहक त्रास आपण का सहन करायचा असा तिचा साधा प्रश्न होता. पण त्या प्रश्नाचे उत्तर पोलिसांकडे नव्हते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायर होत आहे.