भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झाला आहे. यानंतर आता कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार, कोणत्या नेत्याला कोणतं मंत्रिपद दिलं जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह कोणकोणते मंत्री शपथ घेणार याचा पडदा अद्याप उघडलेला नाही. यातच साताऱ्यातून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवेंद्रसिंहराजे आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री करा, या मागणीसाठी राजूर-टेंभुर्णी महामार्गाजवळ असलेल्या मोबाइल टॉवरवर चढून एका पोलीस कर्मचाऱ्यानेच शोले स्टाईल आंदोलनाचं पाऊल उचललं आहे.
नक्की वाचा - Video : भाजपच्या विधीमंडळ नेतेपदाची घोषणा, मात्र बावनकुळे त्यांचंच नाव विसरले; काय आहे तो किस्सा?
सदाशिव ढाकणे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पुढील दोन तासात अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस हे शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री करण्याचं आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका या पोलीस कर्मचाऱ्याने घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून या पोलीस कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यासाठी त्याची मनधरणी करण्याचापर्यंत पोलिसांनी सुरू आहे. गावातील नागरिक ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमा झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उदयनराजेंनी साधला संपर्क...
उदयनराजे भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवरुन संपर्क केला आणि त्याला खाली उतरण्याची विनंती केली आहे.