विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या लँडस्लाइड यशाच्या अकराव्या दिवशी भाजपच्या विधीमंडळ नेतेपदाची घोषणा करण्यात आली आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याचा तिढा सुटला. शपथविधीच्या एक दिवस आधी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झालं आहे.
नक्की वाचा - ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी; पीटीआयची माहिती
आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 11 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी भाजपचे नेते आणि आमदार भाजप विधीमंडळ कार्यालयात उपस्थित होते. केंद्राकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन निरीक्षक म्हणून या बैठकीला हजर होते. याशिवाय पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, विनोद तावडे, गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, अतुल सावे, सदाभाऊ खोत यांच्यासह पक्षातील आमदार उपस्थित होते.
या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला संबोधित करीत होते. यावेळी ते चक्क भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्यासचं विसरले. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. भाजपच्या विधीमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीला भाजपचे राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर्वांचं स्वागत करीत होते. यावेळी त्यांनी मंचावरील प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतलं. विनोद तावडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, जनसुराज्यचे नेते विनय कोरे यांचीही नावं घेतली. मात्र तोपर्यत त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख केला नाही. शेवटी त्यांना याची जाणीव झाल्यास त्यांनी माफी मागितली आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांनी असं म्हणताच सभेत टाळ्यांचा एकच जल्लोष झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world