आता स्वयंपाकघरात अफगणिस्तानच्या लसणाची फोडणी, लसणाचे 30 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक दर...

वाढत्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातून लसणाची आयात होऊ लागली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

देशभरातील लसणाचे घटलेले उत्पादन आणि बाजारात वाढलेल्या मागणीमुळे लसणाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लसणाची फोडणी महाग ठरू लागली आहे. यावर लसणाच्या आयातीने तोडगा काढण्यात आला आहे.  वाढत्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातून लसणाची आयात होऊ लागली आहे. पुणे बाजार समितीमध्ये अफगाणिस्तानातील सुमारे 30 आणि स्थानिक लसणाची सुमारे 100 टन आवक केली जात आहे. त्यामुळे लसणाचे दर तुलनेने नियंत्रणात आले आहेत. सध्या प्रति किलोला लसणाचे दर अनुक्रमे 320 ते 360 आणि 250 ते 350 रुपयांपर्यंत कमी झाले आहे.  

Advertisement

नक्की वाचा - राज्याला हुडहुडी, उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

लसणाच्या दरवाढीमुळे अफगाणिस्तानातील लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतात दाखल होऊ लागला आहे. यामुळे टंचाई कमी होऊन दर नियंत्रणात आले आहेत. तसे झाले नसते तर किरकोळ बाजारातील लसणाच्या दरात मोठी वाढ होऊन प्रति किलोचे दर 500 रुपयांच्या पुढे जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. काही ठिकाणी लसणाचे दर 500 च्या जवळपासही पोहोचले आहेत. 

Advertisement

गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने लसणाचे दर उच्चांकी पातळीवर म्हणजेच 400 रुपये प्रति किलोपर्यंत गेले आहेत. नवीन आवक सुरू होईपर्यंत पुढील दोन महिने दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. लसणाची सर्वाधिक लागवड गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाबात केली जाते. गेले दोन वर्षे लसणाला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी लसणाची लागवड कमी केली आहे. 

Advertisement

नक्की वाचा -  लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ होणार? तर शेवग्याची शेंग 400 रुपयांवर

पुणे बाजार समितीमध्ये लसणाची प्रामुख्याने आवकही मध्य प्रदेश आणि गुजरात येथून होत असते. ही आवक साधारण 50 ते 70 टन होत आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन लसणाचा हंगाम सुरू होईल. फेब्रुवारीत आवक वाढल्यानंतर लसणाचे दर कमी होतील. चांगले दर मिळाल्याने उत्तरेकडील शेतकऱ्यांनी यंदा लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. ही आवक सुरू झाली की दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.