Prithviraj Chavan EXCLUSIVE: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नाही, तर हिंदू दहशतवाद/ सनातनी दहशतवाद म्हणा असं वादग्रस्त वक्तव्य केलं होते. मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्याच्या निकालानंतर केलेल्या त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाने पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनही केले. याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी एनडीटीव्ही मराठीला EXCLUSIVE मुलाखत दिली, यावेळी त्यांनी मालेगाव खटल्यासंदर्भात अनेक गौप्यस्फोट केले.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
"भगवा रंग हा शिवछत्रपतींनी मराठा साम्राज्य स्थापन करताना स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून वापरला. तो पुढे वारकरी संप्रदायातही आला. तो आम्हा सर्वांना प्रिय आहे. त्यामुळे भगव्याचा वापर करु नका. तुम्हाला धर्माचे नाव घ्यायचे असेल तर सरळ घ्या. आणि कोणत्याही धर्माला आतंकवादाशी जोडू नका. ही काँग्रेस पक्षाची भूमिका योग्य आहे," असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Malegaon Blast Case: 'PM मोदींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले'...साध्वी प्रज्ञा यांचा खळबळजनक खुलासा
"अलिकडे संसदेत चर्चा झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही म्हणाले की हिंदू हा आतंकवादी नसतो. माझी त्यांना विनंती आहे की थोडा इतिहास बघा. आतंकवादी हा आतंकवादी असतो. तो कुठल्या जातीचा, धर्माचा नसतो. आतंकवादीही निरपराध लोकांचे बळी घेतो. मुंबईत,मालेगावमध्ये जे घडलं ते निंदनीय आहे. मालेगावमध्ये सहा व्यक्ती मृत झालेत त्यांच्या मुलाबाळांना काय सांगणार आहात? टोलवाटोलवी का करत आहात? गुन्हेगार आहेत त्यांना दोषी म्हणणार आहे की नाही? कोणीच बॉम्बस्फोट केलाच नाही का? त्यामुळे भगवा राजकारणासाठी वापरु नका आणि आतंकवादाला कुठला धर्म नसतो.. अशी माझी स्पष्ट भूमिका आहे," असंही ते म्हणाले.
"हिंदू दहशतवादी नसतो याला माझा विरोध आहे. काय इतिहास आहे? स्वतंत्र भारतातील पहिली दहशतवादी घटना ही नथुराम गोडसेने महात्मा गांधींजींचा खून केला. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश यांची हत्या कोणी केली. नथुराम गोडसेंनी गांधीजींचा खून करण्याआधी धर्म बदलला होत का? राजीव गांधींची हत्या करणारे कोणत्या धर्माचे होते? मणिपूरमध्ये जो हिंसाचार सुरु आहे ते कोणत्या धर्माचे लोक आहेत. त्यामुळे धर्माचे लोक नसतात. असं म्हणणे मला मान्य नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की गुन्हेगारांना शोधा, गुन्हेगारांना शिक्षा द्या' अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.
"मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील एका संस्थेवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केला होता. त्या संस्थेचे नाव होते सनातन संस्था. या संस्थेने दहशतवादी कारवाया केल्याचा अहवाल मला पोलिसांनी दिला होता. त्यानंतर मी भारतीय केंद्रीय मंत्रालयाला पत्र पाठवले. या पत्रात मी संंबंधित संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.