
Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी NIA च्या विशेष न्यायालयाने 17 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष सुटलेल्या आरोपींमध्ये भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. प्रज्ञा सिंह यांनी तरुंगातील आठवणींना उजाळा देताना खळबळजनक खुलासा केला आहे.
त्या म्हणाल्या की, माझ्यावर इतका अत्याचार करण्यात आला की तो शब्दांत मांडता येणार नाही. माजी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एटीएस (ATS) अधिकाऱ्यांनी मला 13 दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. या अटकेदरम्यान मला इतकी यातना आणि अत्याचार सहन करावे लागले की त्यासाठी शब्द कमी पडतील. शब्दांनाही मर्यादा असते.
'मोदी, योगी, भागवत यांची नावे घेण्यासाठी दबाव'
साध्वी प्रज्ञा पुढे म्हणाल्या, "नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांच्यासारख्या लोकांची नावे घेण्यासाठी मला भाग पाडले जात होते. ते म्हणत होते की, या लोकांची नावे घेतली तर आम्ही तुला मारणार नाही. त्यांचा मुख्य उद्देश मला त्रास देणे हा होता. मला सर्वकाही खोटे बोलायला सांगितले जात होते. त्यामुळे मी कोणाचेही नाव घेतले नाही."
( नक्की वाचा : Malegaon Bomb Blast Case : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी )
'तुरुंगात मला मानसिक आणि शारीरिक त्रास'
भाजपच्या माजी खासदार म्हणाल्या की, या लोकांनी त्रास देऊन माझ्याकडून बरेच काही बोलवून घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही खोटे बोलणार नाही. देशाला घाबरण्याची गरज नाही. देशभक्त आपल्या देशासाठी जगतात आणि मरतात. प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, अनेक एटीएस अधिकाऱ्यांनी कायद्याच्या नावाखाली बेकायदेशीर कामे केली आहेत. तुरुंगात मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला गेला.
'भगव्या आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कुटील प्रयत्न'
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी न्यायालयाच्या निर्णयावर सांगितले की, हा भगव्याचा विजय आहे, धर्माचा विजय आहे आणि सनातन धर्माचा विजय आहे. त्यांना पराभूत करण्याची या लोकांमध्ये हिंमत नाही. या लोकांनी त्रास देऊन भगव्याला आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कुटील प्रयत्न केला आहे. अशा लोकांना शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे संपूर्ण प्रकरण रचण्यात आले होते, त्याला कोणताही आधार नव्हता. सत्य प्रकट होते आणि सिद्ध होते, या प्रकरणातही तेच घडले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world