अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Accident CCTV Footage: पुण्यातील खडकवासला गावात एका भरधाव कारने भीषण अपघात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका बेजबाबदार कार चालकाने आपल्या ताब्यातील 'टाटा पंच' कार भरधाव वेगाने आणि हयगयीने चालवून ६ दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ४ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्यात भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यशराज निलेश कांबळे (वय ४ वर्षे, रा. अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. एमएच २५ बीएच ६४८९ (MH 25 BH 6489) क्रमांकाची टाटा पंच कार घेऊन चालक आणि त्याचा साथीदार खडकवासला धरण भागाकडे चालले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील ६ दुचाकी वाहनांना आणि एका रिक्षाला धडक दिली.
या वाहनांना धडक देऊन कार थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या दुकानात घुसली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दुचाकी वाहनांचे आणि रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच ३ ते ४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४ वर्षांच्या यशराज कांबळे याला तातडीने सिंहगड रोडवरील जगताप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
या अपघातानंतर पोलिसांनी कार चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे (वय ३२, धंदा- शेती, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि त्याचा साथीदार प्रकाश तात्याराम कोठारे (वय ३२, रा. चव्हाणमळा, होलेवाडी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली..पुढील तपास नांदेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.