अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Fire: पुण्याच्या राजगड तालुक्यातील दुर्गम धानेप येथील धनगरवस्ती येथे भीषण आगीत चार सख्ख्या भावांची घरे भस्मसात झाल्याची घडली दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र यामध्ये चारही भावांच्या संसारोपयोगी साहित्य मात्र जळून खाक झाले आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Pune News: पुण्यात माणुसकी जिंकली! भररस्त्यात प्रसुती, नवजात बाळाचा श्वास थांबला, पुढं जे घडलं...
धनगर वस्तीत अग्नीतांडव, 4 सख्ख्या भावांच्या संसाराची राख
समोर आलेल्या माहितीनुसार, तोरणा खोऱ्यातील धानेप येथील धनगरवस्ती येथे लागलेल्या भिषण आगीत विठ्ठल महादू डोईफोडे, शिवाजी महादू डोईफोडे, सुरेश महादू डोईफोडे, लक्ष्मण महादू डोईफोडे, या चार सख्ख्या भावांची घरे जळून भस्मसात झाली. घरातील लाईटच्या मीटरला शॉर्टसर्किट झाल्याने तसेच घरामध्ये जनावरांचा चारा भरला असल्याने आगीचा भडका उडून घराला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
घटनेवेळी विठ्ठल डोईफोडे यांच्या आई घरात होत्या. घरात आगीने पेट घेतल्याचे दिसताच त्या बाहेर आल्या. मात्र यावेळी जवळपास कोणीही नव्हते त्यामुळं आग आटोक्यात आणण्यात अपयश आले. यात घरातील दागिने, रोख रक्कम, अन्नधान्य, कपडे, संसार उपयोगी साहित्य, असे मिळून लाखोंचे नुकसान झाल्याचे विठ्ठल डोईफोडे यांनी सांगितले.
मदतीची मागणी
घटनेची माहिती मिळताच धानेपचे तलाठी आत्माराम हापसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. आगीत संसार उपयोगी सामान जळून खाक झाल्याने चार भावंडांचे संसार उघड्यावर आलेत, शासनाने लवकरात लवकर या जळीतग्रस्त कुटुंबाला मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, ही आग नेमकी शॉर्टसर्किटने लागली की डोंगराला लागलेला वनवा अचानक वाऱ्याच्या झोताने मानवी वस्तीजवळ पोहोचला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world