अविनाश पवार, पुणे:
Pune News: पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरातील निर्माण प्लाझा येथे एका गरीब गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची हृदयस्पर्शी घटना घडली. अचानक सुरू झालेल्या तीव्र प्रसूती कळांमुळे ही महिला रस्त्यावरच बसली आणि काही क्षणांतच तिने गोंडस बाळाला जन्म दिला. या प्रसंगाने काही वेळासाठी नागरिकांचे काळजाचे ठोके चुकले, मात्र तत्काळ धावून आलेल्या महिलांनी, डॉक्टरांनी आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहिले.
भररस्त्यात प्रसुती कळा अन् काळजाचा ठोका चुकला
समोर आलेल्या माहितीनुसार, शिरूर जोशीवाडी येथील ही महिला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रस्त्यावरच कोसळलली. निर्माण प्लाझा परिसरात तिच्या कळा तीव्र झाल्या आणि ती रस्त्यातच बसली. काही कळायच्या आतच प्रसूती झाली. घटनास्थळी उपस्थित महिलांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतीला धाव घेतली. काहींनी आपल्या स्कार्फचा वापर केला, तर काहींनी शेजारील कुटुंबांकडून साड्या आणून परिसर बंदिस्त केला. दरम्यान, ही माहिती मिळताच पत्रकार सुदर्शन दरेकर यांनी डॉक्टरांना संपर्क साधला.
काही वेळातच नगरसेविका डॉ. सुनिता पोटे, नगरसेविका पूजा पोटावळे घटनास्थळी दाखल झाल्या. डॉ. सुनिता पोटे यांनी अत्यंत कौशल्याने नवजात बाळाची नाळ कापून आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्या. सुरुवातीला बाळ रडत नसल्याने क्षणभर चिंता निर्माण झाली होती, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतर बाळाने रडायला सुरुवात केली आणि परिसरात एकच आनंदाचा जल्लोष झाला. काही क्षणांपूर्वी चिंतेत असलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर बाळाचे दर्शन होताच हसू फुलले. टाळ्यांच्या कडकडाटात “निर्माण प्लाझावर झाला निर्माणचा जन्म” असे म्हणत नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
पुणेकरांनी दाखवली माणुसकी
या वेळी रिक्षाचालक, मेडिकल स्टोअर चालक आणि स्थानिक नागरिकांनीही मोठी मदत केली. सर्वांच्या सहकार्याने आई आणि बाळाला तात्काळ मिरा नर्सिंग होम येथे हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. सुनिता पोटे यांनी दिली. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी डॉ. सुनिता पोटे, नगरसेविका पूजा पोटावळे, पत्रकार आणि मदतीला धावून आलेल्या सर्वांचे कौतुक केले. ही घटना माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवणारी ठरली. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन संकटात सापडलेल्या एका महिलेच्या मदतीला सर्वजण धावून आले आणि एका नवजीवनाचा आनंद सगळ्यांनी एकत्र अनुभवला.
Sangli News: वाचवायला धावला, दोघांचाही जीव गेला, 2 शाळकरी मुलांच्या मृत्यूने सांगलीत हळहळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world