Public Holiday 20 December : पुणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या नगरपरिषदांसाठी उद्याचा दिवस (शनिवार, 20 डिसेंबर) अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या भागातील नागरिकांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली असून जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पाऊल उचलले आहे.
सार्वजनिक सुट्टी जाहीर
पुणे जिल्ह्यातील ज्या नगरपरिषदांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे, तिथे शनिवार, 20 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना कोणत्याही कामाचा अडथळा येऊ नये आणि मतदानाची टक्केवारी वाढावी,या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कुणाला मिळणार सुट्टी?
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार, जिल्ह्यातील बारामती, दौंड, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या जुन्या नगरपरिषदांसह नव्याने स्थापन झालेल्या फुरसुंगी-उरुळी देवाची या नगरपरिषदेच्या मतदार संघात ही सुट्टी लागू असणार आहे.
या क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, महामंडळे तसेच विविध मंडळांना या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
( नक्की वाचा : Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा, पण आमदारकीवर टांगती तलवार; कोर्टानं काय सांगितलं? )
बाहेर कामाला असणाऱ्या मतदारांनाही दिलासा
या निर्णयाचा फायदा केवळ स्थानिक कर्मचाऱ्यांनाच नाही, तर जे मतदार या मतदारसंघातील रहिवासी आहेत मात्र कामानिमित्त मतदारसंघाच्या बाहेर जातात, त्यांनाही मिळणार आहे. अशा मतदारांना देखील मतदानासाठी सुट्टी लागू राहील.
केंद्र सरकारची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि बँकांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : Pune Development पुणेकरांसाठी 220 Good News; नदी पुनरुज्जीवन ते उड्डाणपूल, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय )
जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना आवाहन
निवडणूक प्रक्रियेत लोकशाहीचा कणा असलेल्या मतदारांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळेच येत्या 20 डिसेंबर 2025 रोजी सर्व पात्र मतदारांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क न चुकता बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. सुट्टीचा लाभ घेऊन मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world