Pune Development Plans :पुणे महानगर क्षेत्रात सध्या 220 महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. या कामांसाठी राज्य सरकारने तब्बल 32,523 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना उत्तम सोयी-सुविधा देण्यास राज्य सरकारचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच,रस्त्यांच्या विकासाचे नियोजन झाल्यावरच शहर विकासाचे आराखडे (Development Plans) तयार करावेत, असे महत्त्वपूर्ण निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुणे महानगर नियोजन समितीची (PMRDA) पाचवी सभा नागपूरमध्ये विधानभवनातील मंत्रीपरिषद सभागृहात पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांसह अनेक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पुणे महानगर क्षेत्रासाठी विहित कालमर्यादेत 'स्ट्रक्चर प्लॅन' (Structure Plan) तयार करताना भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि नागरीकरण याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. हा प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी.
( नक्की वाचा : Cold Wave Alert : महाराष्ट्राला थंडीचा वेढा! 48 तासांत तापमान आणखी घटणार; 14 जिल्ह्यांना अलर्ट 'ही' घ्या काळजी )
विकासकामांचे नियोजन करताना, एकाच क्षेत्राचा विकास वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे न देता, तो एकाच प्राधिकरणाने (Authority) करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
समाविष्ट गावे आणि टाऊन प्लॅनिंगवर भर
23 समाविष्ट गावे: 30 जून 2021 रोजी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचे विकास नियोजन आता पुणे महापालिकेने करावे.
पुणे ग्रोथ हब (Pune Growth Hub): या क्षेत्रासाठी विकास आराखडा शासनाच्या 'मित्रा' (MITRA) संस्थेकडून करण्याबाबतची पडताळणी करण्यात यावी.
टाऊन प्लॅनिंग योजना: पुणे शहरात माण-म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. याव्यतिरिक्त, शहरात एकीकृत टाऊन प्लॅनिंगच्या 15 योजनांवर काम सुरू आहे. या योजनांची कालमर्यादा निश्चित करून त्या वेळेत पूर्ण झाल्यास नागरिकांना त्वरित लाभ मिळेल, त्यामुळे कामात कोणताही विलंब न लावता ते पूर्ण करावे.
पुणे विद्यापीठाजवळील उड्डाणपूल (Flyover) लोकार्पणाची वाट न पाहता तो नागरिकांच्या सेवेसाठी त्वरित सुरू करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, पुणे महानगर समितीच्या सर्व सदस्यांसोबत एक कार्यक्रम आयोजित करून सर्वांची मते जाणून घेऊन, पुणे शहरासाठी भविष्याचा वेध घेणारा 'कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन' (Comprehensive Mobility Plan) तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
(नक्की वाचा : Mumbai - Pune Travel : मुंबई-पुणे फक्त 30 मिनिटांत ! काय आहे प्रवासाचा नवा पर्याय? वाचा सर्व माहिती )
पुणे महानगर प्रदेशातील सुरू असलेली आणि प्रस्तावित विकासकामे
पुणे महानगर प्रदेशात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम सुरू आहे:
रस्ते प्रकल्प: 589 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची 127 कामे सध्या सुरू आहेत.
वर्तुळाकार रस्ता: शहरांतर्गत 83 किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार रस्ता (Ring Road) प्रकल्प प्रगतीपथावर आहे.
जोडणी रस्ते: शहराअंतर्गत विकास केंद्रे (Development Centres), औद्योगिक क्षेत्रे (Industrial Areas) आणि विमानतळाला (Airport) जोडण्यासाठी रस्त्यांची कामे सुरू आहेत.
इतर बांधकाम: पूल (Bridges) आणि उड्डाणपुलांची 3 कामे, गृहनिर्माण (Housing) प्रकल्पांची *3* कामे, तसेच पाणीपुरवठा योजनांची 4 कामे सुरू आहेत. वाघोली पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे.
लवकरच सुरू होणारी कामे
नदी पुनरुज्जीवन: पवना, इंद्रायणी, मुळा आणि मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनाची 3 कामे लवकरच सुरू होणार आहेत.
वाहतूक सुधारणा: चौकांमधील वाहतूक कोंडी (Traffic Congestion) सोडवण्यासाठी 17 कामे हाती घेण्यात येणार आहेत.
पर्यटन आणि वाहतूक केंद्र: 10 पर्यटन विकास केंद्रांची कामे, 1 स्कायवॉकचे काम आणि मल्टी मॉडेल हब प्रकल्पाची 5 कामे सुरू होणार आहेत.
येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग
येरवडा ते कात्रज दरम्यान 20 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग (Underground Tunnel/Highway) प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या या महामार्गाच्या फिजीबिलिटी पडताळणीचे (Feasibility Check) काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजित 7 हजार 500 कोटी रुपयांचा निधी लागण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world