Pune News: महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना! बांगड्या घातल्यात का? म्हणत आरोपीचा कोर्टातही उद्दामपणा

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरणपल्ले यांनी एक हजार रुपये दंड आणि सात दिवस कारावासाची शिक्षा त्याला सुनावली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, पुणे:  पुणे स्टेशनच्या समोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील सुरज शुक्ला नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने कोर्टात न्यायाधीशांसमोरही असाच उद्दामपणा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याला 1 हजारांचा दंड आणि 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे. 

Pune Crime : पुण्यातील संतापजनक कृत्य; महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या सूरज शुक्ला या तरुणाने रविवारी रात्री विटंबना केली. त्याने पुतळ्याच्या छाती, पायावर कोयत्याने वार केले. आरोपी सूरज हल्ला करत असल्याचे आजूबाजूच्या पुणे स्टेशन परिसरातील नागरिकांनी पाहिले. त्यांनी त्वरित धाव घेऊन या सुरज शुक्लाला अडविले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले..

आरोपी सूरज शुक्लाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयासमोर देखील त्याने उद्दामपणा केल्याचे समोर आले आहे. कोर्टात सुनावणीवेळी आम्ही बांगड्या घातल्या नाहीत ? न्यायालयाने बांगड्या घातल्या आहेत का? असे वक्तव्य सूरजने न्यायालयासमोर केले. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरणपल्ले यांनी एक हजार रुपये दंड आणि सात दिवस कारावासाची शिक्षा त्याला सुनावली.

नक्की वाचा - Pune News: वारी मार्गावर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, 'ते' दोन आरोपी अखेर अटकेत

दरम्यान, आरोपी सुरज शुक्ला, मूळचा उत्तर प्रदेशचा, पुण्यात विश्रांतवाडीत भाड्याने राहत होता. रुद्राक्ष माळा विक्री करतो, धार्मिक प्रवृत्तीचा असल्याची माहिती असून तो नुकताच वाईला देवदर्शनासाठी गेला होता. तेथूनच नारळ सोलण्याचे धारदार हत्यार घेऊन पुण्यात आला. या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून काही धार्मिक पुस्तके देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. या या घटनेनंतर पुणे शहर काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त करत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Advertisement