यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Mumbai Expressway 10 Lane Expansion Project: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन झाले. या बिग बजेट प्रोजेक्टमुळे मुंबई- पुणे प्रवास सुसाट होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं 'मिसिंग लिंक'हा मोठा प्रोजेक्ट मार्गी लावल्यानंतर आता आणखी एका नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे.
Mumbai-Pune Expressway वर ट्रॅफिकचा महापूर! प्रशासनाने अचानक 'मिसिंग लिंक'बाबत घेतला हा मोठा निर्णय
मिसिंग लिंकनंतर आणखी एक प्रोजेक्ट!
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Expressway) वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आता कंबर कसली आहे. खालापूर ते लोणावळा दरम्यानच्या 'मिसिंग लिंक' सुरु झाल्यानंतर आता संपूर्ण महामार्ग दहा पदरी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सहा पदरी असलेल्या या महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सुरक्षित प्रवासाला चालना मिळणार आहे.
या भव्य प्रकल्पासाठी सुमारे ५,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महामार्गाची क्षमता वाढवण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिरिक्त लेन बांधल्या जातील. यासाठी साधारण १०० हेक्टर जमिनीची आवश्यकता असून, भूसंपादनाचा सविस्तर प्रस्ताव एमआरडीसीने तयार केला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सुट्ट्यांच्या दिवशी किंवा सणासुदीला बोरघाटात होणारी कोंडी ही एक गंभीर समस्या बनली आहे. यावर १० पदरीकरण हाच कायमस्वरूपी तोडगा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. या विस्तारामध्ये केवळ रस्ते वाढवणेच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने अद्ययावत उपाययोजना, नवीन उड्डाणपूल आणि तांत्रिक सुधारणांचाही समावेश असेल. 'मिसिंग लिंक' प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा महामार्ग सलग १० पदरी झाल्यामुळे मुंबई ते पुणे अंतर केवळ ९० मिनिटांवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world