जाहिरात

Mumbai-Pune Expressway वर ट्रॅफिकचा महापूर! प्रशासनाने अचानक 'मिसिंग लिंक'बाबत घेतला हा मोठा निर्णय

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: सुट्ट्यांमुळे महामार्गावर झालेली वाहनांची तुंबळ गर्दी आणि प्रवाशांना होणारा त्रास पाहून अचानकपणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai-Pune Expressway वर ट्रॅफिकचा महापूर! प्रशासनाने अचानक 'मिसिंग लिंक'बाबत घेतला हा मोठा निर्णय
Mumbai-Pune Expressway Traffic Jam: 1 मे रोजी असलेल्या सुट्टीमुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढली.
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. खोपोली ते कुसगाव दरम्यानचा बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक' मार्ग उद्या म्हणजेच 2 मे रोजी सुरू होणार होता, मात्र प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासनाने हा मार्ग आज, 1 मे रोजीच वाहतुकीसाठी खुला केला आहे. सुट्ट्यांमुळे महामार्गावर झालेली वाहनांची तुंबळ गर्दी आणि प्रवाशांना होणारा त्रास पाहून अचानकपणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

घाटातील वाहतूक कोंडीचा कळस

1 मे रोजी असलेल्या सुट्टीमुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढली. यामुळे खंडाळा आणि आडोशी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. लोकांचा हा त्रास आणि वाढता रोष लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच मिसिंग लिंकचे दोन्ही बोगदे आणि टायगर व्हॅली केबल स्टेड पूल मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला.

( नक्की वाचा : Maharashtra Day 2026: 106 हुतात्मे अन् अथांग संघर्ष! मुंबईसाठी मराठी माणसाने दिल्लीला कसं झुकवलं? वाचा सविस्तर )

 हजारो प्रवाशांना दिलासा

हा मार्ग सुरू होताच घाटातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या हजारो नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, प्रवासाचा वेळही वाचणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग खुला झाल्याचे समजताच अनेक पर्यटकांनी आणि प्रवाशांनी टनेल तसेच केबल स्टेड पुलावर सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पुण्याकडून मुंबईकडे जाणारा मार्ग मात्र सध्या बंदच ठेवण्यात आला आहे.

'मिसिंग लिंक'ला नवे नाव

या ऐतिहासिक प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाचे नाव बदलण्याचे संकेत दिले. आता याला 'मिसिंग लिंक' म्हणण्याऐवजी 'कनेक्टिंग लिंक' म्हणा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या प्रकल्पाचे नवीन नाव लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वेळ आणि इंधनाची मोठी बचत

या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अंतर 6 किलोमीटरने कमी झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नवीन बोगद्यांमुळे आणि पुलामुळे प्रवाशांचा तब्बल 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. घाटातील अवघड वळणे आणि चढ-उतार टाळता आल्यामुळे वाहनांच्या इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. आता काहीही मिसिंग नाही, सर्व काही कनेक्ट झाले आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com