यशपाल सोनकांबळे, पुणे:
Mumbai- Pune Train News: लोणावळा-कर्जत घाटात दरड कोसळल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून विस्कळीत झालेली पुणे-मुंबई रेल्वे सेवा अखेर आजपासून पुन्हा पूर्ववत झाली आहे. मध्य रेल्वेच्या प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत डाउन लाईनवरील अडथळे दूर केल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा एकदा गतीमान झाली आहे. यामुळे हजारो चाकरमानी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई- पुणे रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी..
गेल्या ६ जुलै रोजी घाटात झालेल्या मोठ्या दरड दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. डोंगरावरून आलेले अवाढव्य दगड आणि मातीचा ढिगारा रेल्वे मार्गावर पसरला होता, ज्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली होती. रेल्वेचे १,२०० हून अधिक कर्मचारी आणि अभियंत्यांनी सलग १० दिवस अहोरात्र मेहनत घेत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित केला. मलबा हटवण्यासाठी युनिमॅट मशीन, जेसीबी आणि विशेष 'बोल्डर स्पेशल' ट्रेनचा प्रभावी वापर करण्यात आला.
प्रशासनाने सुरुवातीला डाउन लाईनवर मालगाड्यांची यशस्वी चाचणी केली आणि पूर्ण खात्री पटल्यानंतरच प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आजपासून पुणे-सीएसएमटी दरम्यान धावणारी लोकप्रिय 'डेक्कन क्वीन' आणि 'इंटरसिटी एक्सप्रेस' पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
या गाड्या पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या तिसरी अर्थात 'अप लाईन' सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेची अधिकृत हेल्पलाइन किंवा NTES ॲपवर आपल्या गाडीच्या वेळेची खात्री करून घ्यावी. रेल्वेच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world