देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune News : पुण्याच्या दौंड नगर परिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांचं कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे दौंडचे आमदार राहुल कुल यांसह माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
रोहित पाटील यांनी नागरिक हित संरक्षण मंडळ व भाजप विकास आघाडी कडून प्रभाग क्रमांक चार मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षित जागेवरून दौंड नगर परिषदेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती आणि ते निवडून आले होते. मात्र आता ओबीसी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून अवैध ठरल्याने रोहित पाटील यांचं नगरसेवक पद देखील धोक्यात आलं आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष अमोल यादव, सदस्य सचिव शिवकांत चिकूर्ते, संजय दाणे यांनी हा निकाल दिला आहे. रोहित पाटील यांच्या या ओबीसी प्रमाणपत्रावर रतन सुमंत जाधव, सुशांत सुरेश वाघमारे, सचिन शिवाजी कुलथे, मृणाल ढोले पाटील आणि अनिकेत विजय भागवत यांनी हरकत घेतली होती. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती त्याची अंतिम सुनावणी आज मंगळवारी 16 जून रोजी पार पडली.
कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आलं...
जात पडताळणीच्या एकाच प्रकरणामध्ये प्रतिज्ञा पत्रावर दिलेली वेगवेगळी वंशावळ, रक्त नातेसंबंध, पूर्वजांचे दिलेले महसूल पुरावे, याशिवाय शालेय शिक्षणाचे पुरावे या सर्वांची जात पडताळणी समितीकडून चौकशी करण्यात आली आणि यामध्ये विसंगती आढळल्यानंतर त्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात एडवोकेट मंगेश ससाने यांनी समितीसमोर युक्तिवाद केला आहे. दौंड नगर परिषदेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत 14 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे या कार्यालयात हे प्रकरण जात पडताळणीसाठी पाठवण्यात आलं होतं. रोहित पाटील हे नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित जागेवरून निवडून आल्याने त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा समितीने निर्णय घेतला.
समितीने नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण...
समितीने 12 जानेवारी 2026 रोजी या प्रकरणाची छाननी केली. संबंधित प्रकरणात प्रमाणपत्रासाठी जोडलेले पुरावे तपासले गेले. यादरम्यान रोहित पाटील यांनी समितीकडे रक्ताचे नातेसंबंध दर्शवणारे शालेय पुरावे सादर केले नाहीत. रोहित पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रांमध्ये जे दस्तऐवज पुरावे सादर करायला हवे होते ते न करता केवळ पाटील हे समान आडनाव स्थानिक नागरिकांचे प्रतिज्ञापत्र आणि लेखी जबाब या आधारे कुणबी जातीचा दावा केला होता. संताजी पाटील आणि श्रीपती पाटील यांच्याशी रक्त-नातेसंबंध सिद्ध करण्यासाठी कोणताही दस्ताऐवज पुरावा रोहित पाटील यांनी सादर केला नसल्याने त्यांचा कुणबी जातीचा दावा सिद्ध होत नाही असं निरीक्षण समितीने नोंदवलं. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष अमोल यादव, सदस्य सचिव शिवकांत चिकूर्ते, संजय दाणे यांनी रोहित पाटील यांचं कुणबी प्रमाणपत्र अवैद्य ठरवत असल्याचा निर्णय दिला आहे.