
पुणे: राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू, अशा आश्वासक शब्दांत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना धीर दिला.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मणार धरण परिसरातील बहाद्दरपुरा, शेकापूर, घोडज पूरबाधित नागरिकांशी त्यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला.
मुंबई, ठाण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट! पुढील 5 दिवस धोक्याचे; वाचा हवामान अंदाज
दरम्यान, बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उपमुख्यमंत्री पवार यांना व्हिडिओ कॉल आला. या कॉलदरम्यान पवार यांनी नांदेड जिल्ह्यात नेमक्या कोणत्या भागांत नागरिक अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर किंवा आर्मीची मदत घेण्याची आवश्यकता आहे का? एनडीआरएफचे पथक तातडीने पाठवावे लागेल का याबाबत सविस्तर माहिती घेतली.
“या संकटाच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या जातील. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जाईल. काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. यानिमित्ताने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन सर्वांना झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world