सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
Hinjewadi Shivajinagar Metro News: पुणेकरांसाठी विशेष म्हणजे हिंजवडी आयटी पार्कमधील लाखो नोकरदारांसाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्ग प्रकल्प 3 बाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १५ जूनपर्यंत सुरु होईल असे संकेत दिले जात असतानाच आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो पुन्हा रखडण्याची चिन्हे दिसत असून २०२७ पर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
हिंजेवाडी- शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प खोळंबला?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे आणि पिंपरी चिंचवड आयटी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग ३ प्रकल्प पुन्हा एकदा विलंबाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाने १५ जूनपासून सेवा सुरू करण्याचे संकेत दिले असले, तरी प्रत्यक्ष कामाची संथ गती पाहता हा मुहूर्त हुकण्याची शक्यता असून यामुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
८,३१३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा तब्बल ९७.४० टक्के निधी खर्च झाला असला, तरी प्रत्यक्ष कामाची प्रगती फक्त ९४.५८ टक्क्यांवरच पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यातील मेगापोलिस सोसायटी, इन्फोसिस, विप्रो आणि बालेवाडी स्टेडियम यांसारख्या १२ महत्त्वाच्या स्थानकांवरील अंतिम चाचण्या व सुविधा अजूनही अपूर्ण आहेत.
दरम्यान, २३.२०३ किमी लांबीच्या या मार्गिकेचे काम ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, मात्र सध्याची स्थिती पाहता हा प्रकल्प आता थेट २०२७ पर्यंत लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीने त्रस्त पुणेकरांची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे. अनेक ठिकाणी चाचण्या आणि सुविधा पूर्ण न झाल्याने या कामास विलंब लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world