देवा राखुंडे, इंदापूर:
Hyena Spotted In Indapur: इंदापूर शहरातील सावता माळीनगर परिसरात तरस प्राण्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरस नागरी वस्तीत फिरत असताना काही नागरिकांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले आहे. यावेळी चक्क लहान मुले हातामध्ये लाकडं घेऊन तरसाच्या मागे जाताना पाहायला मिळत आहेत. ही बाब अधिक चिंताजनक आहे.
इंदापुरात बिबट्याची दहशत
पुणे जिल्ह्याच्या दौंड पुरंदर बारामतीच्या काही भागात सध्या बिबट्याचा वावर आहे. आता हे बिबट्याचं लोन अगदी इंदापूर तालुक्यातही पोहोचला आहे. बिबट्याच्या दहशतीखाली शेतकरी वावरत असताना आता तरस प्राण्याचा ही मानवी लोकवस्तीत मुक्त संचार होत असल्याने अधिकच भीती निर्माण झाली आहे. नागरी वस्तीत तरस शिरल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यापूर्वीही 11 ऑक्टोबर 2025 रोजी इंदापूर तालुक्यातील शिरसोडी परिसरात तरस या जंगली प्राण्याचा वावर दिसून आला होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते गेल्या वर्षभरापासून उजनीच्या पट्ट्यात तरस प्राण्याचा वावर आहे. अनेक वेळा या प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांमधून होत असताना वन विभागाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. या प्राण्याच्या बंदोबस्तासाठी अद्याप पर्यंत वन विभागाने कोणतीच ठोस उपाययोजना केलेली नाही.
हा प्राणी तितकासा हिंसक नसला तरी मूळ हा प्राणी जंगली असल्याने काही प्रमाणात तो मनुष्याच्या अंगावरती धावून येतोय. या प्राण्यामुळे इतर पाळीव प्राणी भयभीत होत आहेत. अचानक लोकवस्तीत खेडोपाड्यात किंवा शेतामध्ये हा प्राणी नजरेस पडला तर तो प्राणी अंगावर धावून येत हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय असाही काहींचं म्हणणं आहे. जेव्हा इंदापूर तालुक्यातील चिंदादेवी परिसरात हा तरस नजरेस पडला होता तेव्हा रात्रीच्या वेळी चिंदादेवी पडस्थळ रोडवर लंबाते यांच्या विहिरीजवळ एका मृत प्राण्याच्या शरीराचे लचके तोडताना तो मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.
शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
इंदापूर तालुक्यातील माळवाडी शिरसोडी कांदलगांव भागात तरस प्राण्याचा यापूर्वी वावर दिसून आला आहे. याशिवाय भादलवाडी परिसरात ही तरस प्राणी फिरताना दिसून आला आहे. भादलवाडी परिसरात शेतात रस्ता ओलांडताना तरस प्राण्याचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला होता. तर तालुक्यातील बाभुळगाव-हिंगणगाव सीमेवर तरसाचा मुक्त संचार दिसून आला होता.
एकूणच गेल्या वर्षभरापासून इंदापूर तालुक्याच्या विविध भागात तरस या प्राण्याचा वावर आहे. सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी तरच प्राण्याच्या भीतीच्या छायेखाली आहे. असं असताना वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही त्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world