जाहिरात

Pune News: खेड हादरले! जलजीवन मिशनच्या 50 फूट खोल विहिरीत बुडाला 10 वर्षांचा मुलगा; 24 तासांनतर मृतदेह सापडला

Pune News: खेड तालुक्यातील घोटवडी येथे विहिरीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अथक परिश्रमानंतर मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वाचा सविस्तर घटना...

Pune News: खेड हादरले! जलजीवन मिशनच्या 50 फूट खोल विहिरीत बुडाला 10 वर्षांचा मुलगा; 24 तासांनतर मृतदेह सापडला
"Pune News: 50 फूट खोल विहीर अन् 24 तासांचा थरार"
प्रतिकात्मक फोटो (NDTV Marathi)

- अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune News: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घोटवडी परिसरातील एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडील आणि भावासोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. अथक परिश्रमानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र यांच्या पथकाने मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कैवल्य एकनाथ भोते (वय 10 वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. तो वाशेरे भोतेवाडी येथील रहिवासी  होता. रविवारी (15 फेब्रुवारी 2026) दुपारी कैवल्य आपल्या वडील आणि भावासोबत घोटवडी येथील एका विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. जलजीवन मिशन अंतर्गत ही विहीर खोदण्यात आली होती. पण पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने कैवल्यचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात बुडाला. तब्बल 24 तासानंतर कैवल्यचा मृतदेह आढळला. 

40 ते 50 फूट खोल विहीर, शोधकार्यात अडचणी

ही विहीर सुमारे 40 ते 50 फूट खोल असल्याने स्थानिक ग्रामस्थांना मुलाचा शोध घेणे कठीण जात होते. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी अग्निशामक दल आणि स्थानिक आपत्कालीन पथकाला पाचारण केले. रविवारी (15 फेब्रुवारी) दुपारपासून ते सोमवारी (16 फेब्रुवारी) सकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती, पण मुलाचा पत्ता लागत नव्हता. विहिरीतील गाळ आणि खोलीमुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत होते.

(नक्की वाचा: Beed Crime: महाराष्ट्रात चाललंय काय? 30 जण घरात घुसले, लाठ्याकाठ्यांनी बेदम मारलं, 3 महिला जखमी)

दहा मिनिटांत शोधला मृतदेह

शोध लागत नसल्याने अखेर वारंगवाडी येथील नागरिकांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अविनाश कार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. वन्यजीव रक्षक मावळ आणि लोणावळ्याचे शिवदुर्ग मित्र यांच्या संयुक्त पथकाने अवघ्या 10 मिनिटांत कैवल्यचा मृतदेह शोधून बाहेर काढला. या थरारक शोधमोहिमेत निलेश गराडे, गणेश गायकवाड, मयुर चौधरी, जिगर सोळंकी आणि राजेंद्र बंडगे यांनी मोलाचे सहकार्य केले.

परिसरात हळहळ, पालकांनो सावधान!

मुलाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. अवघ्या 10 वर्षांच्या कैवल्यच्या जाण्याने भोते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेकजण विहिरीवर किंवा नदीवर पोहायला जातात, अशा वेळी मुलांकडे दुर्लक्ष करू नका आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज घेतल्याशिवाय उतरू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com