
Pune News : पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील पांढरेवाडी आणि जिरेगाव ही गावे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या फेज-2 मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रावर भूसंपादन अधिकारी क्र.3 पुणे यांची बनावट सही आणि कार्यालयाचा शिक्का वापरण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे प्रकरण?
हे बनावट पत्र 20 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाला पाठवल्याचा दावा करत आहे. त्यात, पांढरेवाडी आणि जिरेगाव ही गावे MIDC मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव भूसंपादन अधिकारी कार्यालयाने पाठवला असल्याचे नमूद केले आहे. मात्र, हे पत्र पूर्णपणे खोटे असून, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी ते तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
( नक्की वाचा : Maratha Morcha traffic change: पुणेकरांनो लक्ष द्या! मराठा मोर्चासाठी वाहतुकीत मोठा बदल, हे आहेत पर्यायी मार्ग )
पोलिसांत गुन्हा दाखल
या बनावट पत्राची गंभीर दखल घेत भूसंपादन अधिकारी कार्यालयाने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कामात हस्तक्षेप, सरकारी सही आणि शिक्क्याचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी क्र.3, डॉ. संगीता राजापूरकर-चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले की, कार्यालयाकडून असे कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. हे पत्र पूर्णपणे बनावट असून, नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या पत्रांवर विश्वास ठेवू नये.
या घटनेमुळे, कोणतीही अधिकृत माहिती केवळ सरकारी कार्यालयांच्या अधिकृत माध्यमांद्वारेच तपासावी आणि अशा सोशल मीडियावरील पत्रांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.