- अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर शुक्रवारी (5 मार्च) तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता. पण या आनंदाच्या वातावरणात अचानक भीती पसरलीय. यामागील कारण म्हणजे मधमाशांचा हल्ला. आनंदोत्सवामध्ये मधमाशांच्या (आग्यामोहोळ) हल्ल्यामुळे व्यत्यय आला. या घटनेत सुमारे पाच ते सहा शिवभक्त जखमी झाले आहेत. यादरम्यान गडावर काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवनेरी गडावर नेमके काय घडलं?
शुक्रवारी (5 मार्च) सकाळपासूनच शिवनेरी गडावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. तिथीनुसार शिवजयंती असल्याने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या मुख्य टप्प्यात म्हणजेच शिवरायांचा पाळणा हलवण्याचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. हा सोहळा संपल्यानंतर काही वेळातच अचानक गडावरील एका कोपऱ्यातून आग्यामोहोळ (मधमाशांचा हल्ला) उठले. काही कळण्याच्या आतच मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला.
प्रशासकीय तत्परता आणि उपचार
मधमाशांच्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. उपस्थित नागरिक स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधू लागले. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच ते सहा व्यक्तींना तातडीने गडाखाली नेण्यात आले आणि जुन्नर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय.
(नक्की वाचा: Maval Accident: शिवज्योत घेऊन धावताना भयंकर घडलं; मावळमधील 2 शिवभक्तांचा मृत्यू; हृदयद्रावक घटना)
शिवनेरीवर खासदार होत्या उपस्थितविशेष म्हणजे या सोहळ्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तपास सुरू
मधमाशांचे मोहळ अचानक का उठले? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. सध्या वनविभाग आणि पोलीस प्रशासन या घटनेचा सविस्तर तपास करत असून गडावरील उर्वरित भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या घटनेमुळे काही काळ उत्सवात व्यत्यय आला असला, तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासनाकडून भाविकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.