Pune News : पुण्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील मौजे वढू बुद्रुक येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी रात्री १०.०० ते १८ मार्च २०२६ रोजी रात्री १०.०० वाजेपर्यंत परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
पुण्यातील वाहतूक मार्गात बदल...
कोरेगाव भीमा बाजूकडून चाकण-पाबळकडे जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भीमा-सणसवाडी-शिक्रापूर-गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच चाकण-पाबळकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला-गॅस फाटा-शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव भिमा मार्गे वळविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - Pune News : गुढीपाडव्याला पुण्यात धो धो; हवामान विभागाकडून वादळी पावसाचा इशारा
कोरेगाव भीमा बाजूकडून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना संस्थेजवळील ठरविण्यात आलेल्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चाकण आणि पाबळ मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना वढू-वाजेवाडी चौफुला मार्गावरील पार्किंग स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास परवानगी राहणार नाही. मात्र व्ही.व्ही.आय.पी., व्ही.आय.पी. तसेच शासकीय वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.