लुप्त झालेलं मंदिर पाण्याबाहेर; पुण्याहून 50 किमी अंतरावर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना पाहण्यासाठी मोठी गर्दी

वेळवंडी नदीवरील हे प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक तसेच इतिहासप्रेमींची मोठी गर्दी होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य पाटील, प्रतिनिधी

Pune News : भोरमधील भाटघर धरणामध्ये 7 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणाची पातळी वेगाने खाली गेल्यामुळे, वर्षभर पाण्यात लुप्त असणारे ऐतिहासिक 'कांबरेश्वर मंदिर' गेल्या आठ दिवसांपासून पाण्याबाहेर येऊ लागले आहे. वेळवंडी नदीवरील हे प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक तसेच इतिहासप्रेमींची मोठी गर्दी होत आहे.

सन १९२८ मध्ये इंग्रज सरकारने लॉइड डॅम (भाटघर धरण) बांधले. मात्र त्यानंतर हे मंदिर धरणाच्या पाण्याखाली गेलं. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणी कमी झालं की, हे मंदिर पाण्याबाहेर येतं. या मंदिराचं मूळ नाव 'कर्महरेश्वर' असल्याचं सांगितलं जातं. परंतु कांबरे गावाच्या हद्दीत असल्याने ते 'कांबरेश्वर' म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच वास्तू विशारद, अभियंते, इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. दरवर्षी स्थानिक ग्रामस्थ मंदिरातील गाळ काढून स्वच्छता करतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार; CNG च्या दरात पुन्हा वाढ, लवकरच शंभरी गाठणार?

कसं आहे हे मंदिर? 

पाण्यातही वास्तुकला भक्कम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नेहमी गुडघाभर पाणी असते. भाविक पाण्यात हात घालून स्वयंभू शिवलिंगाला स्पर्श करतात. मंदिरात पार्वती माता आणि नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतींचे बांधकाम आयताकृती दगडांचे असून, कळसाचे बांधकाम चुनखडक, वाळू आणि विटांमध्ये आहे. दरवर्षी येणाऱ्या गाळामुळे मंदिराच्या समोरील पाच पायऱ्या जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत. मंदिराच्या समोर प्राचीन शिळा आणि वीरगळ पाहावयास मिळतात. पाण्याचे असंख्य तडाखे खाऊनही हे मंदिर आजही भक्कम उभे आहे. पांडवकाळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं. मात्र या मंदिराची रचन हेमाडपंथी असल्याने हे पांडवकालीन मंदिर नसून हेमाडपंथी असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे