अविनाश पवार, प्रतिनिधी
देहूनगरीतून संत तुकारामांची पालखी १८ जून रोजी मार्गस्थ झाली असून आज सायंकाळी आळंदीतून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपुरच्या दिशेने रवाना होणार आहे. भाविक जय हरी विठ्ठलाचा नामघोष करीत आहेत. सध्या पुण्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात पुढील काही दिवस तुफान पावसाचा अंदाज असताना भाविकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज सायंकाळी आळंदीमधून संत ज्ञानेश्वरांची पालखी ही मार्गस्थ होणार आहे. याकरिता प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली आहे. मात्र काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पडणारा पाऊस आणि इंद्रायणी नदीमध्ये वाढलेले पुराचे पाणी यामुळे प्रशासनासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. इंद्रायणी नदी काठावर आता वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. सायंकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे आळंदीला वैष्णवांची मोठी गर्दी जमा होत आहे.
आळंदीला आल्यानंतर वारकरी हे इंद्रायणी नदी पात्रात हातपाय धूत असतात आणि त्यानंतर मंदिराकडे दर्शनाला जात असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी काठावर देखील आपली नजर ठेवलेली आहे. संध्याकाळी पालखीचे प्रस्थान होणार आहे. याकरिता आता पूर्ण तयारी झालेली आहे.