सूरज कसबे, प्रतिनिधी
काहीही चुकीचं करण्यापूर्वी देवाला घाबरावं असं वरिष्ठांकडून सांगितलं जातं. लहानपणीही काही चुकीचं करू नये म्हणून आई-बाबा देवाची भीती घालतात. खोटं बोललास तर बाप्पा कान कापेल असंही आपल्या लहानपणी पालकांनी सांगितलं आहे. मात्र पुण्यातील चोरट्याने मात्र कशाची भीती, तमा न बाळगता देवाचा आशीर्वाद घेऊन त्याच्याच दानपेटीतून चोरीचा 'श्रीगणेशा' केल्याचं समोर आलं आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad crime) अज्ञात तीन चोरट्यांनी महादेव मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला आहे. ही सपुर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चऱ्होली येथील वरमुखवाडी परिसरात असलेल्या साई मंदिराच्या आवारात हे मंदिर आहे. शनिवारी दुपारी हे चोरटे मंदिरात शिरले होते. यातील एक चोरटा महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन दानपेटीतील पैसे काढताना सीसीटीव्हीत दिसतोय.
नक्की वाचा - Pune Goodluck Cafe : गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरत्या काळासाठी निलंबित; FDA ची मोठी कारवाई
त्याआधी दुसऱ्या दोन चोरट्यानी मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदीच दर्शन घेतलं, मग दानपेटीतील पैसे काढलेत. बनावट चावी वापरून दानपेटीमधील पैसे घेऊन अज्ञात तिघे चोरटे फरार झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. 18 ते 25 वयोगटातील या चोरट्यांनी दानपेटीमधील किती पैसे चोरले याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीय. मंदिर प्रशासनाच्या वतीने याबाबत दिघी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलिस करत आहेत. मात्र देवाला नमस्कार करून त्याच्याच मंदिरातील दानपेटीतील चोरी करणारे चोरटे सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.