राहुल तपासे, सातारा
महाबळेश्वर-पाचगणी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका 25 वर्षीय पर्यटकाची स्थानिक नागरिकांनी केवळ संशयावरून बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली आहे. अक्षय रमेश जाधव असे मृत तरुणाचे नाव असून तो पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील रहिवासी होता. दारूच्या नशेत एका घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहत असल्याचा संशय आल्याने मुलीच्या फोननंतर तिचे वडील आणि त्यांच्या साथीदारांनी अक्षयला चिखलात पाडून लाकडी दांडक्यांनी अमानुषपणे मारले. या
मित्रांनी रूमला कडी लावली, पण तो खिडकीतून बाहेर पडला
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय जाधव हा बुधवारी त्याच्या 5 मित्रांसह पाचगणी-महाबळेश्वर परिसरात पर्यटनासाठी आला होता. ते येथील भोसे गावातील एका हॉटेलमध्ये मुक्कामास होते. बुधवारी रात्री अक्षयने जास्त दारू प्यायली होती. त्यामुळे तो हॉटेलमध्ये काही गोंधळ घालू नये म्हणून मित्रांनी त्याला खोलीत झोपवले आणि बाहेरून कडी लावून ते हॉटेलच्या टेरेसवर गेले.
(नक्की वाचा- Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन)
शोध सुरू असताना सापडला जखमी
रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मित्र जेव्हा खोलीकडे परत आले, तेव्हा अक्षय खोलीत नव्हता. मित्र त्याला शोधण्यासाठी बाहेर पडले असता, हॉटेलपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर अक्षय अत्यंत गंभीर आणि रक्ताळलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला आणि तिथे काही स्थानिक लोक जमा झाले होते.
चिखलात पाडून अमानुष मारहाण
तपासात समोर आले की, मद्यधुंद अवस्थेत हॉटेलबाहेर पडलेला अक्षय हा स्थानिक रहिवासी सूर्यकांत गोळे यांच्या घराच्या खिडकीजवळ गेला आणि आत डोकावून पाहू लागला. घरात असलेल्या मुलीला संशयास्पद हालचाल जाणवताच तिने तात्काळ फोन करून आपल्या वडिलांना याची माहिती दिली. मुलीचा फोन येताच सूर्यकांत गोळे याने आपल्या इतर साथीदारांना गोळा केले. अक्षय दारूच्या नशेत असल्याने त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. संतापलेल्या सूर्यकांत आणि त्याच्या मित्रांनी अक्षयला पकडून रस्त्यावरील चिखलात पाडले. त्यानंतर लाकडी दांडके, लाथा आणि बुक्क्यांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत अमानुषपणे मारहाण केली.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: एक सल्ला जीवावर बेतला! अल्पवयीन मुलाकडून 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या)
मुख्य आरोपीसह 4 जणांना बेड्या
गंभीर जखमी झालेल्या अक्षयला त्याचे मित्र आणि स्थानिकांच्या मदतीने तातडीने पाचगणी, त्यानंतर वाई आणि प्रकृती अधिक खालावल्याने बारामती येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी सूर्यकांत गोळे, अविनाश भोसले, राहुल राजपुरे आणि अमोल वाडकर या 4 जणांना अटक केली आहे.