पुणे शहरात ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या कंपन्यांच्या कॅबमधून प्रवास करणाऱ्या पुणेकरांना चालकांच्या मनमानीचा फटका बसत आहे. हिवाळ्याचे दिवस असतानाही दुपारी जाणवणाऱ्या उकाड्यामुळे जेव्हा प्रवासी कॅबमधील एसी सुरू करण्याची मागणी करतात, तेव्हा चालकांकडून जादा पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नक्की वाचा: शाळेच्या वॉशरुमध्ये मैत्रिणीला.. तर शिक्षिकेला केले प्रपोज, विद्यार्थिनीच्या प्रतापाने पुणे हादरले
AC साठी प्रत्येक किलोमीटरमागे 25-30 रुपयांची मागणी
सिंहगड रोड परिसरातील रहिवासी तपन बेलापूरकर यांनी या संदर्भात आपला अनुभव सांगितला. त्यांनी नऱ्हे येथून रॅपिडोवरून कॅब बुक केली होती. प्रवासाचे भाडे 145 रुपये असताना चालकाने एसी सुरू करण्यासाठी थेट प्रति किलोमीटर 30 रुपये जादा भाडे मागितले. प्रवाशाने याला नकार दिला असता, चालकाने तक्रारीची भीती न बाळगता एसी बंदच ठेवला. असाच काहीसा प्रकार अक्षय रैना या प्रवाशासोबतही घडला. पुणे रेल्वे स्टेशनला जात असताना चालकाने त्यांना सांगितले की, सकाळी 11 वाजेपूर्वी एसी लावला जात नाही आणि लावायचा असल्यास 25 रुपये प्रति किलोमीटर अतिरिक्त द्यावे लागतील. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
नक्की वाचा: प्रवासाला निघण्यापूर्वी ही बातमी वाचा! 26 डिसेंबरपासून रेल्वे तिकीटाचे दर वाढणार, वाचा सविस्तर
नियमांना फासला जातोय हरताळ
पुणे आरटीओने यापूर्वीच कंपन्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, अनेक चालकांपर्यंत हे नियम पोहोचलेच नाहीत किंवा ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. भारतीय गिग वर्कर्स फ्रंटने यावर चालकांचे समुपदेशन सुरू असल्याचे म्हटले आहे. कॅब चालकांच्या मते, मीटरप्रमाणे मिळणारे भाडे परवडणारे नसल्याने ते अशा मार्गांचा अवलंब करत आहेत. मात्र, यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे. यासंदर्भात रॅपिडोच्या सूत्रांनी माहिती दिली की, जर प्रीमियम किंवा एसी कॅब असेल, तर प्रवाशाच्या सांगण्यानुसार एसी सुरू करणे बंधनकारक आहे.