राहुल तपासे, सातारा:
Puegaon Yatra Bailgada Sharyat Final VIDEO: पुसेगाव येथील प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान मंगळवारी पार पडले. प्रथमच चिठ्ठीवर दोन्ही बैलगाडा मालक आणि बैलांची नावं व एकंच चिठ्ठी अशा प्रकारे नोंद घेत १२०० गाड्यांची नियोजन असेलेल्या मैदानात १००० + विक्रमी गाड्यांची नोंद झाली होती. १११ गट, १२ सेमी व एक फायनल असा तब्बल १२४ फेऱ्यांचा खेळ दिवस उगवता सुरू झाला अन मावळताना संपला. राज्यभरातून अनेक छोट्या मोठ्या नावाजलेल्या बैलगाडामालकांनी सहभाग घेतला. सकाळी ७.४५ पासून मैदानातील पहिला फेरा पळायला खाली गेला अन संध्याकाळी दिवस मावळायच्या आत फायनल चा फेरा सुटला होता.
बैलगाडा प्रेमींची तुफान गर्दी; लक्षा- सचिनने पटकावलं मैदान
शर्यतीत गटापासूनच काटाकिर्रर्र लढती पहायला मिळाल्या. अनेक नवख्या बैलांनी गट पास केला. काहींनी काटाकिर्रर्र लढत दिली. घासाघीस झाली. बकासुर आणि पाखऱ्याला प्रभू आणि पक्षाने दिलेली लढत बघण्यासारखी होती. अनेक सामान्य बैलगाडामालकाची बैलं या मैदानात उजेडात आली. इतर मैदानातील फायनलचा गुलाल अन पुसेगावचा गटपास बरोबरीचा.
सेमीफायनलमध्येही टाॅपच्या लढती पहायला मिळाल्या. काही सेमीफायनलमध्ये अपेक्षित बैलजोडींना तोडीसतोड लढत देऊन विजय मिळवून नवीन चेहऱ्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. रेठऱ्याचं रनमशीन अच्युत ड्रायव्हर रेठरेकरने साखरवाडीच्या बावऱ्यासह मथुरला पुन्हा एकदा फायनलला पात्र केला तर दुसरीकडं फाॅर्चुनर आणि वडकीचा हिंदकेसरीचा मानकरी लखन ने पंढरी शेठ फडकेंच्या सर्जासह दिमाखात फायनलमध्ये धडक दिली. सोबत महत्वाची म्हणजे वडकीच्या हिंदकेसरी मैदानात फायनलला दोन नंबरला राहालेली सचिन आणि लक्ष्या ही आदत जोडीही फायनलला राहिली.
फायनलमध्ये आदत सचिन लक्ष्या आणि लखन व सर्जामध्ये काटाकिर्रर्र लढत झाली. यावर्षीचा प्रथम क्रमांकाचा पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा मान शाहिद भाई मुलानी नातेपुते यांचा 'सचिन' आणि चांदेगाव येथील 'लक्षा' या बैल जोडीला मिळाला. लखन आणि सर्जा दुसर्या क्रमांकावर राहिले. मथुर अन बावऱ्या तिसऱ्या क्रमांकावर राहिले. गोविंदा बलमा चार तर पक्षा आणि फन्ट्या पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले.शंभु आणि सोन्यानं सहावा तर रामाशेठ आणि वजीर नं सातवा क्रमांक पटकवला.
बुलेट अन् बलमानेही गाजवलं मैदान...
हिंदकेसरी मैदानात लक्षात रहाणारी गाडी ठरली खडकवासला करांचा बुलेट आणि बलमा. पहिल्याच गटाला पहिल्या तासावरून गटपास. सेमीला सुद्धा कड आणि फायनलचा गुलाला सुद्धा कडेनं घेतला. बलेट-बलमासह पाच गाड्या फाॅल झाल्यानं उत्तेजनार्थ पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. त्यात चिंचाळेकरांचा घरचा साज अर्जुन आणि राजा, व्हिआयपी राणा आणि बादशाहा, सम्राट आणि तेज्या, कारगिल आणि डाॅन गुलालात राहिले.
एकंदरीत जल्लोषात पुसेगाव हिंद केसरी मैदान पार पडलं. बैलगाडामालकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. युट्यूब च्या माध्यमातून लाखो लोकांनी पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा आनंद घेतला. पुसेगाव हिंद केसरीचा गुलाल घेणारी बैलं पुढील वर्षभर गुलालात रहातात हा इतिहास आहे. या बैलगाडा शर्यतींचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीन पुसेगाव मध्ये दाखल झाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world