सुनील दवंगे, प्रतिनिधी
Ahilyanagar Rahuri Dog Bite News : राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात साहेबराव राघुजी वाघमारे या 70 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि..
मिळालेल्या माहितीनुसार,साहेबराव वाघमारे हे त्यांच्या घरासमोरील दुकानाजवळ झोपलेले असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याचवेळी कुत्र्याने परिसरातील इतर नागरिकांनाही चावा घेतला.कुत्र्याच्या हल्ल्यात एकूण 15 जण जखमी झाल्याचं समजते.
नक्की वाचा >> Badlapur News : बदलापूर, वांगणी परिसराला वादळी वाऱ्याचा फटका! दोन दिवसांपासून बत्ती गुल, काही शाळांना सुट्टी
आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभागाचे पथक घटनास्थळी दाखल
या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.स्थानिक प्रशासन,आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभागाचे पथक तसेच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे चिंचोली फाटा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.