संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
राहुल गांधी यापुढे लोकसभेच्या विरोधी पक्षनेते या नव्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते जनतेसोबत वावरताना, त्यांचे प्रश्न समजून घेताना दिसले. 'जोडो भारत यात्रे'दरम्यान राहुल गांधींनी देशभरात दौरा केला आणि जनतेचं मनात घर केलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातही अनेक सभा घेतला. आता तर राहुल गांधी (Rahul Gandhi will walk for a day in Ashadhi Wari) पंढरीच्या वारीत सामील होणार असल्याची माहिती आहे.
पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात राहणाऱ्या पांडुरंगाचा उत्सव. महाराष्ट्रातील या वारीने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांना अचंबित केलं आणि या वारीत सामील होण्यास भाग पाडलं. अशा या वारीत सामील होण्यापासून राहुल गांधीही स्वत: रोखू शकणार नसल्याचं दिसतंय. यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत.
पायी वारी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज सोहळ्यात राहुल गांधी वारकरी भक्तांसोबत पायी चालणार आहेत. शरद पवार यांच्या 'वारी अनुभवा' ह्या घोषित कार्यक्रमा नंतर राहुल गांधी देखीदेखील पंढरीच्या वारीत सहभागी होणार आहेत. वारकरी भक्तांसोबत पायी सोहळ्यानंतर पंढरपुरात येऊन राहुल गांधी विठ्ठलाचं दर्शनही घेतील. दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठीकडून पंढरपूर येथील शिरस्थ पदाधिकारी यांच्याकडे वारी बाबत माहिती घेतली जात आहे. राहुल गांधी यांच्या वारी दौऱ्याबाबत विश्वसनीय माहिती NDTV मराठी च्या हाती लागलेली आहे.
नक्की वाचा - विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार; किती असेल पगार, काय सुविधा?
पंढरीच्या वारीत महाराष्ट्र, देशाभरात परराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने सामील होतात. आषाढी वारीत दरवर्षी सर्वसाधारपणे बारा लाखांहून अधिक भाविक सामील होतात. साधारण महिनाभरापासून महाराष्ट्रातील गावखेड्यातील नागरिक आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून पंढरीच्या भेटीसाठी चालत राहतात. महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यात आता राहुल गांधी सामील होणार आहेत.