काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी आता संसदेत नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवत आहेत. काँग्रेसने हंगामी अध्यक्ष भतृहरि महताब यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली. 2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या तब्बल दहा वर्षांपासून लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद रिकामी होतं. आता राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काम करतील. भारतीय लोकशाहीत अशी अनेक पदं शक्तिशाली मानली जातात. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचाही समावेश आहे. यातून राहुल गांधी यांना कॅबिनेटचा दर्जा मिळेल आणि त्यानुसार पगार, सुविधा दिल्या जातील.
विरोधी पक्षनेतेपद इतकं महत्त्वाचं का असतं?
विरोधी पक्षनेतेपदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. केवळ या एकाच गोष्टीमुळे विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचं नसतं. हा नेता विरोधी पक्षांची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच अनेक संयुक्त संसदीय पॅनल आणि निवड समितींचा भाग असतो. यामध्ये सीबीआयचे संचालक, सेंट्रल विजिलेन्स आयुक्त, भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, मुख्य सूचना आयुक्त, लोकायुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांची निवड करणाऱ्या समितींचा समावेश आहे. विरोधी नेता म्हणून राहुल गांधी या निर्णयात थेट दखल देऊ शकतील. या समितींच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आता विरोधी नेता राहुल गांधी यांचं मत आवश्यक ठरेलं.
राहुल गांधी सीबीआय आणि अशाच इतर संस्थांवरून सरकारवर आरोप करीत आले आहेत. अशात या संस्थांच्या वरिष्ठ पदांच्या नियुक्तीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल. याशिवाय विरोधी नेता म्हणून राहुल गांधी लेखा समितीचे प्रमुख असतील. अशात सरकारच्या आर्थिक क्षेत्रातील निर्णयात त्यांचं बारीक लक्ष असेल आणि त्याचं विश्लेषण करू शकतील. लेखा समितीच सरकारी खर्चांचा तपास करते. अशात राहुल गांधींवर विरोधी नेत्यासह या जबाबदाऱ्याही आल्या आहेत.
विरोधी नेत्याचा पगार किती असतो? आणि सुविधा काय मिळतात?
लोकसभेत विरोधी नेतेपद सांभाळणाऱ्या खासदाराला केंद्रीय मंत्र्याप्रमाणे पगार मिळतो आणि त्यानुसार भत्ता आणि इतर सुविधा मिळतात. विरोधी नेत्याला दर महिना 3.30 लाख पगार मिळतो. सोबतच कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे बंगला मिळतो. सोबतच चालकासह कार आणि जबाबदारी सांभाळण्यासाठी चौदा जणांचा स्टाफ मिळतो.
राजीव गांधी आणि सोनिया गांधींनीही सांभाळलं आहे विरोधी नेतेपद..
गांधी कुटुंबातून विरोधी नेतेपद सांभाळणारे राहुल गांधी तिसरे सदस्य आहेत. त्यांचे वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांनी विरोधी नेतेपद सांभाळलं आहे. राजीव गांधी 18 डिसेंबर 1989 ते 24 डिसेंबर 1990 पर्यंत या पदावर होते. त्यानंतर सोनिया गांधी 3 ऑक्टोबर 1999 ते 6 फेब्रुवारी 2004 पर्यंत विरोधी पक्ष नेत्या होत्या.
विरोधी नेतेपदासाठी 54 खासदारांची आवश्यकता...
शेवटी 2009 से 2014 या काळात सुषमा स्वराज लोकसभेत विरोधी नेत्या होत्या, त्यानंतर हे पद थेट राहुल गांधींना मिळालं आहे. 2014 आणि 2019 या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचे 54 खासदार जिंकून आले नव्हते. नियमांनुसार, विरोधी नेतेपदासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी दहा टक्के म्हणजे 54 खासदार तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला तो आकडा गाठता आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे 99 खासदार निवडून आले आहेत. काही सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला राहुल गांधी विरोधी नेतेपद घेण्यासाठी इच्छुक नव्हते. शेवटी त्यांनी पक्षांच्या मागण्या मान्य केल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world