Maharashtra Rain : महाराष्ट्र राज्यात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये यंदा पावसाने कहर केला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर पावसाचा कहर पाहायला मिळाला. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे, याचे प्रमुख कारण हवामान प्रणालीतील मोठे बदल आहेत. महापुरामुळे माती धुपून गेली आहे, घरे, जनावरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अचानक इतका प्रचंड पाऊस येण्यामागे नेमके काय कारण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मान्सूनच्या प्रणालीत मोठा बदल
राज्यात पडत असलेल्या पावसामागे मुख्य कारण म्हणजे मान्सून प्रणालीची बदललेली स्थिती आणि बंगालच्या उपसागरात झालेली विशिष्ट निर्मिती आहे. यंदा मान्सून मे महिन्यातच महाराष्ट्रात दाखल झाला आणि सुरुवातीच्या टप्प्यात त्याने चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर मान्सूनने थोडी विश्रांती घेतली, पण त्यानंतर कहर सुरू झाला.
विश्रांतीनंतर मान्सूनसोबत सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले. याचा परिणाम म्हणून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरु झाला. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यानंतर बंगालच्या उपसागरात एकामागे एक कमी दाबाचे पट्टे तयार झाले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ही स्थिती एक-दोन वेळा नव्हे, तर तब्बल 16 ते 18 वेळा निर्माण झाली.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी ही कमी दाबाची स्थिती निर्माण झाली. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात विविध भागात पाहायला मिळाला. यामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र कमी दाबाचा पट्टा दोन्ही तयार झाले आहेत.
मान्सूनचा लांबलेला प्रवास आणि भविष्यातील चिंता
यंदा मान्सून लवकर आला आणि परतीचा प्रवासही लांबणीवर पडला आहे. यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 5 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील, असा अंदाज आहे. या बदललेल्या प्रणालीमुळे पुन्हा एकदा 30 सप्टेंबरपर्यंत धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील 5 वर्षांपासून मराठवाड्यात हळूहळू पावसाचे प्रमाण वाढत आहे. 2015 मध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाल्यानंतर प्रत्येक वर्षी हे प्रमाण वाढले आहे आणि यंदा तर ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.