YouTuber Mahi Khan Controversy: एअर इंडियाच्या विमानामध्ये एका महिलेने युट्युबर माही खानला मराठीत बोल असं म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सदर प्रकारावरून या महिलेला लक्ष्य करून तिला ट्रोल केलं जात होतं. मात्र आतापर्यंत जी माहिती समोर आलीय ती हादरवणारी आहे. मूळात ही महिला मराठी नसून ती बंगाली आहे. बंगाली असूनही मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या या महिलेला या सगळ्या प्रकारानंतर भयंकर त्रास सहन करावा लागतोय. ह्युंडाय कंपनीमध्ये कामाला असलेल्या या महिलेला नोकरी सोडावी लागली आहे. इतकंच नाही तर या प्रकारानंतर तिला फोनवरून सतत वाईटसाईट बोललं जात असून तिला शिव्याशाप दिले जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे ही महिला वैतागली आहे.
नक्की वाचा: 'ही' मराठी अभिनेत्री होणार सदा सरवणकरांची सून, साखरपुडा संपन्न, PHOTO
माही खान आणि मुग्धा मजुमदार यांच्यात नेमका वाद काय झाला ?
मुग्धा मजुमदार असं पीडित महिलेचं नाव असून तिने विमानात नेमकं काय झालं हे सविस्तरपणे सांगितलंय. त्यांनी म्हटलं की, त्या चहा पीत असताना पुढच्या सीटवर बसलेल्या माही खानने सीटचं बॅकरेस्ट अचानक मागे घेतलं. यावर पीडित महिलेने माही खानला उद्देशून म्हटलं की, 'भाऊ जरा हळू' ही महिला आपल्याशी मराठीत बोलतेय याचा राग आल्याने माही खानने या महिलेशी वाद घालायला सुरूवात केली. पीडित महिलेने म्हटलंय की, मी काही तो व्हिडिओ बनवला नव्हता. माही खानच्या व्हिडिओमुळे माझी नोकरी गेली, माझी अब्रू धुळीस मिळाली. या व्हिडीओनंतर मला धमकीचे कॉल पण आले, बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या. या महिलेने पुढे म्हटलंय की, माही खानने सीट मागे घेतल्यानंतर माझ्या अंगावर पुढ्यात ठेवलेलं जेवण अंगावर सांडलं, मी त्याला याबद्दल खडसावलं आणि जेवण उचल म्हणूनही सांगितलं. त्यावरूनही त्याने माझ्याशी उद्धटपणे वर्तन केलं असं या महिलेने म्हटलं आहे.
नक्की वाचा: 'आयुष्य जणू थांबल्यासारखं..', प्रार्थना बेहेरेंच्या वडिलांचे अपघाती निधन, भावुक पोस्ट
कोंबडा बनवणार, अविनाश जाधव यांनी घेतली शपथ
ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या महिलेची भेट घेतली. यानंतर त्यांनी म्हटले की, माही खान YouTube ला त्याचे व्ह्यूज वाढावेत यासाठी हे सगळं करतोय. मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही.मी माही खान याला मराठी बोलायला लावणार, हा माझा शब्द आहे. सगळ्या मराठी भाषाप्रेमींनी माही खान याच्या युट्युब चॅनेल सकट त्याच्या सगळ्या सोशल मीडिया हँडल्सना रिपोर्ट करा, असं आवाहन जाधव यांनी केलं आहे. 'माही खान याला आम्ही शोधून काढत मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनवून बसवला नाही ना, तर अविनाश जाधव माझं नाव नाही.'असं मनसेच्या अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.