Rajyasabha Election 2026: राज्यसभेच्या उमेदवारीवरुन सध्या महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीमधून एकच जागा राज्यसभेसाठी जाणार आहे, त्यामुळे ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरु आहेत. अशातच आता ठाकरे गटामध्येच राज्यसभेसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरे गटात रस्सीखेच!
राज्यसभेचे उमेदवारी मिळण्याआधीच ठाकरे गटात उमेदवारी मिळवण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे हे राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी मधून एकच जागा राज्यसभेसाठी जाणार असल्याने तिन्ही पक्ष आपला उमेदवार जावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शरद पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले असताना ठाकरेंच्या शिवसेनेत एकाच जागेसाठी उमेदवारी पक्षाला मिळण्याआधीच ही परिस्थिती पाहायला मिळत आहे विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे.
शरद पवारांचं काय ठरलं?
दरम्यान, राज्यसभेच्या जागेसाठी आजचा दिवस महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. काल रात्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र शरद पवारांनी आपला निर्णय नेत्यांवर सोपवल्याची माहिती मिळत आहे. राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरे गटही आग्रही आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही शरद पवारांना या जागेसाठी पुन्हा मैदानात उतरवण्यासाठी तयार आहे. पुन्हा या नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल.
Pune News: पुण्यात पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी! 'RDX' वापरण्याचा ईमेलमध्ये उल्लेख
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world