जाहिरात

Pune News: पुण्यात पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी! 'RDX' वापरण्याचा ईमेलमध्ये उल्लेख

Pune Baner Passport Office : पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवरील पासपोर्ट कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune News: पुण्यात पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी! 'RDX' वापरण्याचा ईमेलमध्ये उल्लेख

देवा राखुंडे, पुणे

पुण्याच्या बाणेर-पाषाण लिंक रोडवर असलेल्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाला गुरुवारी  धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या या ईमेलमध्ये कार्यालय आरडीएक्सने उडवून देण्याचा इशारा देण्यात आला होता. या घटनेमुळे पासपोर्ट कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

'BDDS' कडून संपूर्ण परिसराची झाडाझडती

गुरुवारी सकाळी पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर हा धमकीचा संदेश आला. घटनेची माहिती मिळताच, पुणे पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) पाचारण केले. पथकाने संपूर्ण कार्यालय, पार्किंग आणि आसपासच्या परिसराची अत्यंत बारकाईने तपासणी केली. सुदैवाने, संपूर्ण तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके मिळून आली नाहीत, ज्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

(नक्की वाचा-  BMC Mayor News: मुंबई महापौरांच्या हातात 1 कोटींचं घड्याळ? माध्यमांवर चर्चा; स्वतः रितू तावडेंनी केला खुलासा)

कायदेशीर कारवाई आणि पोलीस तपास

या प्रकरणी पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी जतिन रवींद्र पोटे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी अज्ञात ईमेल धारकाविरोधात गुन्हा गुन्हा नोंदवला आहे. परिमंडळ 4 च्या पोलीस उप-आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.  सायबर पोलिसांच्या मदतीने हा ईमेल कोणत्या 'आयपी ॲड्रेस'वरून आला, याचा शोध बाणेर पोलीस घेत आहेत.

(नक्की वाचा-  Rinku Singh's Father: रिंकू सिंहवर दुःखाचा डोंगर! वर्ल्ड कपदरम्यान वडिलांचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी)

पुण्यात वाढतेय अफवांचे पेव?

गेल्या काही महिन्यांत पुण्यातील महत्त्वाच्या वास्तूंना धमकीचे ईमेल मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश वेळा हे ईमेल खोटी अफवा  असल्याचे समोर आले आहे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रत्येक धमकीकडे गांभीर्याने पाहत आहेत. अशा प्रवृत्तींमुळे सरकारी कामात व्यत्यय येत असून नागरिकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com