जाहिरात
Story ProgressBack

धुळ्यातील 154 वर्ष जुन्या श्रीराम मंदिराचे हे आहे वैशिष्ट्य  

Ram Navami 2024: धुळ्यातील प्राचीन श्री राम मंदिराबाबतची अनोखी माहिती-इतिहास आपण जाणून घेऊया...   

Read Time: 5 min
धुळ्यातील 154 वर्ष जुन्या श्रीराम मंदिराचे हे आहे वैशिष्ट्य  

- धनश्री कलाल-ठाकूर/धुळे

Ram Navami 2024: धुळ्यातील आग्रा रोडवरील 154 वर्षांपूर्वीचे प्राचीन श्रीराम मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. देशामध्ये असे हे दोनच मंदिर आहेत की जेथे प्रभू श्रीराम यांच्या मांडीवर बसलेल्या अवस्थेत सीतामाता यांची मूर्ती आहे. यापैकी एक मंदिर म्हणजे उत्तर प्रदेशातील कांगडा या गावात आहे तर दुसरे मंदिर धुळ्यातील आग्रा रोड परिसरातील श्रीराम मंदिर...   

जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील भव्यदिव्य श्रीराम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले आहे. या लेखाद्वारे आपण धुळ्यातील प्राचीन श्री राम मंदिराबाबतची अनोखी माहिती-इतिहास आपण जाणून घेऊया... 

रत्नजडित सिंहासन ! वरी शोभे रघुनंदन ! 
वामांगी ते सीताबाई ! जगतजननी माझी  आई ! 
पश्चातभागी लक्ष्मण ! पुढे अंजनीनंदन !
भरत,शत्रुघ्न भाई ! चामर ढाळती दोन्ही बाही !
नल नील,जांबुवंत ! अंगद,सुग्रीव,बिभिषण भक्त ! 
देह बुद्धी नेणो काही ! दास अंकित रामापायी !

या श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या अभंगामध्ये वर्णन केल्यानुसार हे मंदिर आहे लंकाविजयी प्रभू श्रीरामचंद्राचा अयोध्येतील हा 'विजयी राम  दरबार' आहे. नाशिकमधील गोराराम आणि काळाराम मंदिराच्या कल्पनेनुसार धुळे शहरातील हे मंदिर जणू धुळ्याचे भूषण आहे. शहरामध्ये 'काळाराम मंदिर' असावे असे ब्रह्मचारी बुवा म्हणजेच श्री नारायण व्यंकटेश कावळे यांना वाटले. कावळे हे रामदासी होते. खोल गल्लीतील पुरंदरे यांच्या श्रीराम मंदिरात ब्रह्मचारी बुवा श्रीरामाची अत्यंत तल्लीनतेने पूजा करत असत. केसराचा गंध, रंगीत कपडे, नैवेद्य अर्पण असे साग्रसंगीत पूजा झाल्यानंतर धुळेकर  रामभक्ती पाहण्यासाठी अलोट गर्दी करत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Dhanshree Kalal Thakur

मंदिराच्या बांधकामाचा इतिहास 

अयोध्यापती श्रीराम यांनी लंकेवर विजय मिळवून रावणाचा पराभव केला, यानंतर अयोध्येमध्ये जो विजयी दरबार भरला होता. त्या दरबाराच्या वर्णनाप्रमाणे हे राम मंदिर बांधण्याचे स्वप्न ब्रम्हचारी बुवा उर्फ नारायण व्यंकटेश कावळे यांनी पाहिले आणि या स्वप्नपूर्तीसाठी धुळ्यातील कायदे पंडित गिरीधरभाई गुजराथी यांच्या पणजोबांकडे इच्छा व्यक्त केली. त्यांनी ही कल्पना उचलून धरत त्वरित आग्रारोड येथील आपली जागा नारायण कावळेंना वर्ष 1870च्या सुमारास दान केली. मंदिर बांधकामास साधारणतः 1872 पासून प्रारंभ झाला. या मंदिराच्या बांधकामाचा इतिहास असा की नागपुरातील सीताबर्डी भागात जागा घेऊन तेथे देखरेखीअंतर्गत दगड घडवण्यात आले. कळसाचे कोरीव काम सुद्धा येथेच घडवले. जयपूरहून मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला, ते वर्ष होते 1875. हे मंदिर नागर शैलीमध्ये बांधण्यात आले आहे.

कावळे प्रभू श्रीरामाची भारतीय ऋतुमानानुसार पूजा करायचे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये नैवद्यासाठी श्रीखंड, आंब्याचे पन्हे, चंदनाची उटी, वाळ्याचे पडदे, मलमलीचे कपडे, पंखा, तर थंडीत उबदार कपडे,  खिचडीचा नैवेद्य असे ऋतूनुसार देवाची सेवा करत असत.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Dhanshree Kalal Thakur

कशी आहे मंदिराची रचना?

या मंदिराची रचना तीन टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. पहिला टप्पा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार, दुसरा टप्पा म्हणजे भव्य सभा मंडप आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गर्भगृह. जे एकूण सोळा सुंदर नक्षीकाम असलेल्या खांबावर आणि सोळा सुंदर अशा कमानींवर उभे आहे. हे मंदिर म्हणजे वास्तूकलेचा, बांधकामाचा एक उत्कृष्ट आदर्श नमुना.  

मंदिराच्या गर्भगृहाची खासियत  

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच जुना मुंबई-आग्रा रोडवर हे श्रीराम मंदिर असून हे 'पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर' आहे. पट्टाभिषिक्त म्हणजे श्रीराम आणि रावणाच्या युद्धानंतर म्हणजे लंका विजयानंतर अयोध्येच्या सिंहासनावर राज्यभिषेकासाठी आरूढ असलेल्या प्रसंगाप्रमाणे मूर्तीचे हे अद्वितीय असे मंदिर आहे. म्हणजेच श्रीरामाचे डाव्या मांडीवर सीतामाता बसलेल्या आहेत आणि श्रीरामाच्या उजव्या बाजूस लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, दक्षिणमुखी हनुमान, नल, निल, जाम्बुवंत, कपिल असा हा संपूर्ण 'राम दरबार' आपल्याला पाहायला मिळतो. भारतात असे रामदरबाराचे एकमेव मंदिर असावे, असे जाणकार सांगतात.

जमिनीपासून साधारणतः चार फूट उंचीच्या सुंदर अशा चबुतऱ्यावर या मूर्ती विराजमान करण्यात आल्या आहेत. मूर्तींच्या मागील बाजूस भिंतीवर अॅल्युमिनियम धातूच्या पत्र्यावर पॉलिश केलेले चांदीचे सुंदर असे प्रभावळ असलेले  दिसते. तसेच श्रीरामाची मूर्ती हे एकाच काळ्या रंगाच्या पाषाणापासून निर्माण केलेली आहे आणि मस्तकावर सुवर्ण, अन् हिरे मोत्यांनी सजवलेला मुकुट असून चांदीची मोठी नक्षीदार छत्रं सुद्धा नजरेत भरते. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार उंच असून सर्वात उंच दर्शनी भागावर उजव्या बाजूस चंद्र, ससा तर तर डाव्या बाजूस सूर्य असे कोरीवकाम तसेच गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उंचावर दोन्ही बाजूस गजसिंहाच्या दगडी कोरीव मूर्ती आहेत.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Dhanshree Kalal Thakur

तसेच वरील दोन्ही बाजूस हत्तीच्या सोंडेचा आकार आणि मध्यभागी श्रीगणेश व आजूबाजूस रिद्धीसिद्धींचे दर्शन घडते. गर्भगृहाच्या बाहेरील ओट्यावर तीन नक्षीदार कमानी असून मधली कमान मोठी व आजूबाजूच्या कमानी लहान आहेत. सुंदर असे कोरीव नक्षीकाम दगडी खांबावर कमळांच्या फुलावर आधारित असल्याचे लगेच लक्षात येते. त्याचप्रमाणे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर डाव्या बाजूस जय आणि उजव्या बाजूस विजय द्वारपाल यांच्या मूर्ती आहेत. 

गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस म्हणजे ओट्यावर चारही बाजूने एकूण सोळा कमानीसह सोळा कोरीव नक्षीकाम केलेले दगडी खांब आहेत. त्यातील दर्शनी भागाच्या खांबावरील कमानीवर आतून आणि बाहेरून दोन सुंदर अशा मोरांनी पिसारा फुलवलेला असून मध्यभागी राक्षसाचा चेहरा दर्शवला आहे. तसेच मंदिराच्या बाहेरील भिंतीवर डाव्या बाजूस भगवान हनुमानाची सुंदर संगमरवरी मूर्ती दृष्टीस पडते. ही मूर्ती सहसा हनुमानासह उभ्या स्थितीत प्रभू श्री राम आणि सीतामाता यांच्या दोन्ही बाजूला बसलेले असते. पण येथे ही एकटी स्वतंत्र मूर्ती दृष्टीस पडते. ही मूर्ती हनुमानाची भक्ती दर्शवते आणि ती भक्ती-निष्ठेचे प्रतीक मानले जाते. अशाप्रकारे या मंदिरात हनुमानाच्या एकूण तीन मूर्ती आहेत.

गर्भगृहाच्या बाहेरील सोळा खांब व कमानींवर वैविध्यपूर्ण मूर्ती, कोरीवकाम, नक्षीकाम पाहायला मिळतात. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Dhanshree Kalal Thakur

मंदिराचे सभामंडप

श्रीराम मंदिरामध्ये साधारणतः 25 फूट लांब आणि 25 फूट रुंदीचा सभामंडप असून याची उंची जमिनीपासून जवळपास 30 फूट आहे. 20 सागवानाचे भरभक्कम खांब असून एका खांबाची रुंदी साधारणपणे एक फुटापेक्षा अधिक आहे. प्रत्येक खांबाच्या खाली दोन बाय दोन फूट आकाराचा दगडी बेस असून त्यावर हे चौकोनी खांब उभे आहेत, सोबतच 20 खांबाप्रमाणे 20 भव्य अशा कमानी सुद्धा दिसतात. हे मंदिर हे पेशवे पद्धतीचे असून दोन मजली सभामंडप हवेशीर आहे. बैठक व्यवस्था एखाद्या मोठ्या वाड्यासारखी दिसते.  


NOTE: मंदिरासंदर्भातील ही माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त अभय नाशिककर यांच्याकडून जाणून घेतली आहे.  

आणखी वाचा

Video अयोध्येच्या नव्या मंदिरातील पहिली रामनवमी! पाहा पारणं फेडणारा सूर्यतिलक सोहळा

अयोध्येत रामनवमी साजरी करण्याचे भाग्य 5 शतकांच्या प्रतीक्षेनंतर लाभले - PM मोदी

प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination