लक्ष्मण सोळुंके, जालना
लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला. सलग 5 वेळा लोकसभा गाठणारे रावसाहेब दानवे मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्या विरोधात पराभूत झाले. जरांगे यांचं आंदोलन सुरू असताना दानवे यांनी,"मनोज जरांगे यांना कोण बोलायला लावतं याचा शोध घेणं गरजेचं आहे, असं सांगत जरांगे यांच्या बोलण्यातून तुतारीचा वास येतो", असं वक्तव्य केलं होतं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यामुळे मराठा समाजात त्यांच्या विरोधात प्रचंड लाट तयार झाली आणि दानवे पराभूत झाले. आता विधानसभा निवडणुकीत मात्र दानवे यांनी आपल्या मुलाच्या मतदानावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून सावध भूमिका घेतलीय. मनोज जरांगेंच्या बोलण्यातून तुतारीचा वास येण्याची भाषा करणाऱ्या दानवे यांनी आता त्यांची भाषा पूर्णपणे बदलली आहे."एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे अंतरवाली सराटी येथे लाठीमार झाल्याचं दानवे यांनी म्हंटल. दानवे यांच्या या विधानावरून त्यांची भाषा बदलल्याचं कळतंय.
जरांगे फॅक्टर अजूनही या विधानसभा निवडणुकीत गणित बदलू शकतात, अशी भीती रावसाहेब दानवे यांच्या मनात असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. दानवे यांचे पुत्र संतोष दानवे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. संतोष दानवे यांच्या विरोधात माजी आमदार आणि आधी 2 वेळा पराभूत झालेले माजी आमदार चंद्रकांत दानवे हे उभे आहेत. सध्या संतोष दानवे यांच्या मतदारसंघात मराठा समाजात अजूनही प्रचंड नाराजी असून जरांगे यांचा जलवा अजूनही कायम आहे.
( नक्की वाचा : महायुती आणि मविआचे जाहिरनामे काय सांगतात? मत देण्यापूर्वी वाचा सर्वांची आश्वासनं )
लोकसभा निवडणुकीत नाराज झालेल्या मराठा समाजाने यावेळी पुत्र संतोष दानवे यांना मतदान करावं अशी दानवे यांची अपेक्षा असावी. त्यामुळे त्यांच्या तोंडी आता अंतरवाली सराटी येत असून लाठीचार्ज हा एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे घडला, असं वक्तव्य दानवे यांना करण्याची वेळ आली आहे. शेवटी पुत्राच्या पराभवाची भीती अजूनही दानवे यांच्या मनात घर करून बसली की काय अशीही चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुलाला निवडून आणण्याचं मोठं चॅलेंज दानवे यांच्यासमोर आहे. लोकसभेत स्वतः दानवे यांना पराभूत व्हावं लागलं. आता मुलगा पराभूत झाल्यास दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परीणाम होईल, असं भाकीत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
( नक्की वाचा : लातूरमध्ये विलासरावांच्या मुलासमोर भाजपाचं तगडं आव्हान, थेट लढतीचा निकाल काय लागणार? )
त्यामुळे दानवे यांनी भोकरदन जाफराबाद मतदारसंघात मुलाच्या विजयासाठी जोरदार फिल्डिंग लावली असून नाराज असलेल्या मराठा नेते आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थात या सगळ्या महत्वाच्या घडामोडी घडत असल्या तरी मतदारसंघातील जनता दानवे यांना किती गांभीर्याने घेते, याचा फैसला निवडणुकीच्या निकालानंतरच होणार आहे.