Ratnagiri News : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी हा दरविकेंडचा प्रश्न प्रवाशांना सहन करावा लागतो. शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक लोणावळा, महाबळेश्वर आणि कोकणाच्या दिशेने जात असतात. परिणामी येथे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. १३ जून शनिवारीही इंदापुर आणि माणगावमध्ये कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा असल्याची माहिती आहे. दरम्यान गोव्याला जाणाऱ्या नागरिकांचा वाहतूक कोंडीचा त्रास काही अंशी कमी होणार असल्याचं चित्र आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका...
मुंबई गोवा महामार्गावरील पुलांच्या कामाच्या विलंबाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांमधून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या पुलांची कामे अंतिम टप्प्यात आली असून हे पूल लवकरच वाहतुकीसाठी पूर्णपणे खुले होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्याच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात टप्प्याटप्प्याने हे मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
संगमेश्वर पुलाची एक बाजू सुरू झाली असून ३० जूनपर्यंत या पुलाची दुसरी बाजूही वाहतुकीसाठी खुली करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तर रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. १७ जूनपासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल. तर लांजा शहरातील बाजारपेठेच्या भागातून जाणाऱ्या पुलाचे कामही आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. या पुलाच्या पूर्णत्वासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. लांजा येथील ब्रिज ३१ जुलैपासून वाहतुकीस खुला झाल्यानंतर या भागातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे योग्य विभाजन होणार आहे.