Ratnagiri Accident: थार कारचा थरार! रिक्षाला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू, चिपळूणमधील भीषण दुर्घटना

Ratnagiri Accident: पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी

चिपळूण-कराड महामार्गावर पिंपळी गावाजवळ मंगळवारी रात्री उशीरा एक हृदयद्रावक अपघात घडला. वेगाने येणाऱ्या एका थार जीपने समोरून येणाऱ्या रिक्षाला इतकी जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या धडकेत रिक्षातील चार प्रवासी आणि थार जीपचा चालक, असे एकूण 5 जण जागीच ठार झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, थार गाडी अतिशय वेगाने येत होती आणि तिचा वेग इतका जास्त होता की चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, गाडीने रिक्षाला धडक दिली. धडकेनंतर थार गाडी पुन्हा एका ट्रकला जाऊन धडकल्याचेही सांगितले जात आहे. अपघातात ठार झालेले सर्व 5 जण पुरुष आहेत. मृतांमध्ये पिंपळी नुराणी मोहल्ला येथील 4 नागरिकांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच, चिपळूणचे डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षक त्यांच्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे.

या अपघातामागे नेमके काय कारण होते, थार चालक कोणत्या दिशेने आणि कोणत्या उद्देशाने प्रवास करत होता, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. एकाच गावातील चार नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याने पिंपळी गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Topics mentioned in this article