राकेश गुडेकर, रत्नागिरी
Ratnagiri News: नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. रत्नागिरी तालुक्यात शिवसेना (ठाकरे गटाला) एकाही जागेवर यश मिळवता आले नाही. या सर्वंकष पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे सोपवला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राजीनाम्यामागची प्रमुख कारणे
शेखर घोसाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, निवडणुकीच्या निकालांनी त्यांच्या कष्टावर पाणी फेरले. तालुक्यातील सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याने संघटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी स्वतःला जबाबदार धरले आहे. अनेक बड्या नेत्यांनी साथ सोडलेली असतानाही घोसाळे यांनी तालुक्यात संघटना टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती. मात्र, मतदारांनी दिलेल्या कौलामुळे ते व्यथित झाले आहेत.
(नक्की वाचा- Budget Session: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून, तर अर्थसंकल्प 6 मार्चला मांडणार)
"मी कट्टर ठाकरेप्रेमीच राहणार"
राजीनामा दिला असला तरी शेखर घोसाळे यांनी आपली निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशीच असल्याचे स्पष्ट केले आहे. "निवडणुकीतील पराभव मनाला लागल्याने मी स्वेच्छेने पदाचा त्याग करत आहे. पण मी कट्टर ठाकरेप्रेमी असून यापुढेही सामान्य शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे. मी कोणत्याही परिस्थितीत अन्य पक्षात जाणार नाही," असे घोसाळे यांनी ठामपणे सांगितले.
रत्नागिरीतील राजकीय चित्र
या निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यात सत्ताधारी महायुतीने (शिंदे शिवसेना आणि भाजप) वर्चस्व राखले आहे. ठाकरे सेनेला बालेकिल्ल्यात मिळालेला हा धक्का ठाकरेंच्या सेनेसाठी चिंताजनक मानला जात आहे. घोसाळे यांच्या राजीनाम्यानंतर आता रत्नागिरी तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाते, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.