Maharashtra Rain Update : यंदा नवरात्रौत्सवात पावसाचे संकेत हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवले होते. मराठवाड्यात अद्यापही पूरसदृश्य परिस्थिती असून आज राज्यातील इतर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार आज पहाटे रायगड जिल्ह्यासह रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा वर्तविण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास, नागरिकांना सुरक्षित निवारा किंवा मदत शिबीरांमध्ये हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विशेषतः समुद्र किनाऱ्याजवळील गावांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे आणि भरती-ओहोटीच्या वेळा तपासून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. शासन आणि प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे तयार असून, कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. सुरक्षित ठिकाणी राहावे, जुन्या किंवा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच, गरज असल्यासच घराबाहेर पडावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या प्रशासकीय कार्यालयाशी किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा. या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहनही रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनंतर आणि मराठवाड्यातील पूरस्थिती पाहता NDRF कडून मराठवाड्यात NDRF चे एकूण ५ पथक तैनात करण्यात आले आहेत. सोलापूरमध्ये दोन , धाराशिवमध्ये दोन, बीड 1 आणि लातूर जिल्ह्यात 1 NDRF चे एक पथक तैनात ठेवण्यात आले आहे. तर पुणे, मुंबई,ठाणे आणि नागपूर शहरातल्या NDRF पथकांसाठी हाय अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्ग वाढवण्यात आला असून घाटमाथ्यावर सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे विसर्ग वाढवण्यात आला आहे. 6 हजार 864 क्युसेक पाण्याचा विसर्ग रात्री 9 पासून खडकवासला धरणातून करण्यात आला आहे.