Mumbai News: परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम... मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुसाट!

भौगोलिक स्थिती, पर्जन्यमान, वाहतुकीचा भार इत्यादी बाबी लक्षात घेता डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट काँक्रिटचे रस्ते हा अधिक चांगला पर्याय ठरतो आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण (सीसी) कामांना आता चांगलाच वेग आला आहे. प्रगतिपथावर असणारी बहुतांशी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून, खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न आहेत. या नियोजनानुसार अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे पूर्णत्वास आली आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे दिनांक 17 एप्रिल 2025 ते दिनांक 23 एप्रिल 2025 या 7 दिवसांच्या कालावधीत  2 हजार 650 रेडी मिक्स काँक्रिट मिक्सर वाहनांचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच दररोज सरासरी 378 रेडी मिक्स काँक्रिट मिक्सर वाहनांमधुन पेव्हमेंट क्वालिटी कॉंक्रिटचा पुरवठा झाला आहे. यानुसार  तब्बल 18 हजार 560 घनमीटर सिमेंट काँक्रिट (PQC) वापरून रस्ते काँक्रिटीकरण पूर्णत्वाकडे पोहोचले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे ध्येय ठेवून, सिमेंट काँक्रिट रस्ते तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. काँक्रिट रस्ते डांबराच्या रस्त्यांपेक्षा अधिक काळ टिकतात. ते अवजड वाहतुकीला आणि हवामानातील बदलांना जास्त चांगले तोंड देतात. एकदा का काँक्रिट रस्ता तयार झाला, तर त्याची देखभाल दुरुस्ती करायचा खर्च फार कमी असतो आणि वेळोवेळी दुरुस्तीची गरजही कमी भासते. मुंबईतील भौगोलिक स्थिती, पर्जन्यमान, वाहतुकीचा भार इत्यादी बाबी लक्षात घेता डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट काँक्रिटचे रस्ते हा अधिक चांगला पर्याय ठरतो आहे.

Advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदा अधिकाधिक रस्ते सिमेंट काँक्रिटने मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी रस्ते आणि वाहतूक विभागाचे अधिकारी अविरत कार्यरत आहेत. सर्वच रस्त्यांवर रात्रीच्या वेळी सुरु असलेली कॉंक्रिटीकरणाची कामे करून वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिमेंट काँक्रिट रस्ते अधिक टिकाऊ आणि खड्डेमुक्त असल्याने मुंबईकरांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास अनुभवता येईल.

Advertisement

नक्की वाचा - Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक 31 मे 2025 पर्यंत अधिकाधिक रस्ते काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष आहे. काँक्रिट कामाचा दर्जा अत्युच्च असावा याकडे काटेकोर लक्ष दिले जात आहे. गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासण्या केल्या जात आहेत.

Advertisement

महानगरपालिकेचे सर्वच वरिष्ठ अधिकारी शहर आणि पूर्व तसेच पश्चिम उपनगरांमधील प्रत्यक्ष कार्यस्थळास सातत्याने आणि वारंवार भेट देऊन पाहणी करत आहेत. तसेच विविध निर्देश देत आहेत. आकस्मिक पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यास आर्थिक दंड ठोठावण्यासह कठोर प्रशासकीय कारवाईदेखील करण्यात येत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमधील अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे  पूर्णत्वाकडे पोहोचली आहेत. दिनांक 17 एप्रिल 2025 ते दिनांक 23 एप्रिल 2025 या 7 दिवसांच्या कालावधीत तब्बल 18 हजार 560 घनमीटर (Cubic Meter) उच्च प्रतीचे सिमेंट काँक्रिट (PQC) वापरून रस्ते तयार करण्यात आले आहेत. 

'ठाण्यात न्यायालयाबाहेर न्याय देण्याचा प्रयत्न', एकनाथ शिंदेंसमोर न्यायमूर्ती थेट बोलले!

पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) म्हणजे रस्त्याच्या पायाभूत भागासाठी वापरण्यात येणारे उच्च दर्जाचे सिमेंट काँक्रिट होय. हे काँक्रिट विशेषतः रस्ते मजबूत, टिकाऊ आणि खड्डेमुक्त राहावेत म्हणून वापरले जाते. जर एखाद्या रस्त्याचा भाग लांबी x रुंदी x जाडी याप्रमाणे मोजला, तर त्याचे घनफळ म्हणजेच काँक्रिटचे घनमीटर प्रमाण ठरते.

मागील सात दिवसात 2 हजार 650 रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर वाहनांचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच दररोज सरासरी ३७८ रेडी मिक्स काँक्रिट मिक्सर वाहनांमधुन पेव्हमेंट क्वालिटी कॉंक्रिटचा पुरवठा झाला आहे. 

रेडी मिक्स काँक्रिट मिक्सर वाहन  हे एक विशेष प्रकारचे वाहन आहे, ज्यामध्ये फिरणाऱ्या ड्रममध्ये (rotating drum) तयार केलेले सिमेंट काँक्रिट भरलेले असते. हे वाहन आरएमसी प्रकल्प (Ready Mix Concrete Plant) वरून बांधकामस्थळी काँक्रिट पोहोचवते. ड्रम सतत फिरत असल्यामुळे काँक्रिट घट्ट न होता त्याचे मिश्रण एकसंध राहते. या ट्रकच्या वापरामुळे वेळेची बचत होते आणि काँक्रिटच्या  गुणवत्तेवर नियंत्रण ठेवता येते.