जाहिरात

Rohit Pawar : 'तो रिपोर्ट आला असता तर अजित दादा जिवंत असते'; रोहित पवारांनी विमान कंपनीचा काढला इतिहास

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताचा घटनाक्रम सांगितला. आणि विमानाच्या कंपनीबाबत संशय व्यक्त केला आहे. 

Rohit Pawar : 'तो रिपोर्ट आला असता तर अजित दादा जिवंत असते'; रोहित पवारांनी विमान कंपनीचा काढला इतिहास

Rohit Pawar press conference on Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे निधन झालं. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याला जबर धक्का बसला. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुंबईहून बारामतीला विमानाने जात असताना हा विमान अपघात झाला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर आलं असून राष्ट्रवादी नेत्यांसह पवार कुटुंबाकडून या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताचा घटनाक्रम सांगितला. आणि विमानाच्या कंपनीबाबत संशय व्यक्त केला आहे. 

अजित पवारांच्या विमानाचा घटनाक्रम...

अजित पवार २८ जानेवारीला मुंबईहून बारामतीला निघाले होते. मुंबई ते बारामती २१० किलोमीटर अंतरासाठी २७ मिनिटं लागणार होती. व्हीएसआर कंपनीच्या Learjet विमानाने अजित दादा बारामतीला निघाले होते. हे विमान 51 हजार फूट उंचीवर प्रवास करू शकतं ही त्याची खासियत. इतर विमानं ४१ हजार फूट उंचीपर्यंत प्रवास करू शकतात. या विमानात दादा डाव्या बाजूला बसलेले असावेत असं अंदाज आहे. विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग हे व्हिएसआर कंपनीचे संचालक आहेत. मात्र त्याव्यतिरिक्त या कंपनीत २७ शेअर होल्डर आहेत. व्हीएसआरकडे २०२८ पर्यंत एअर ऑपरेशन परमिट आहे. 

अपघाताच्या दिवसाची टाइमलाइन

सकाळी ७.०२ मिनिटांनी विमानातील कर्मचारी विमानतळावर पोहोचले. यानंतर त्यांनी बारामती एअरपोर्टला फोन केला. दृश्यमानता तपासण्यात आली. ७.५० मिनिटाला अजित पवार विमानतळावर पोहोचले. यानंतर सर्व तपासणीनंतर ८.१० मिनिटाला टेक ऑफ झालं. विमान ८.२२ मिनिटाला लोणावळ्याजवळ होतं. ८.३० यवत गावाजवळ. ८.३२ सुपे गावाजवळ आणि ८.४३ ते ८.४५ या काळात अपघात घडला. सकाळी ९ वाजता अजित दादा  गंभीर जखमी आहेत अशी माहिती आली. ९.४५ ला अजित दादांच्या निधनाची बातमी आली. 

विमानाचा इतिहास..

हे विमान १६ वर्षांपूर्वीचं होतं. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी २५ आणि २६ जानेवारी रोजी या विमानाने मुंबई ते सुरत आणि सुरत ते मुंबई असा प्रवास केला होता. विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेन्टेन होतं असं सांगितलं. अपघात दृश्यमानतेमुळे झाल्याचं कंपनीच्या मालकांकडून सांगण्यात आलंय. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये आकाशातच विमान तिरकं झालं आणि संतुलन बिघडल्यामुळे कोसळल्याचं दिसत आहे. 

कंपनीवर संशय....

अजित पवाराचा अपघात झालेल्या विमानाच्या कंपनीवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. याबाबत रोहित पवार यांनी सांगितलं, यापूर्वी २०२३ मध्ये  (१४ सप्टेंबर २०२३ ) VSR कंपनीच्या Learjet विमानाचा अपघात झाला होता. सर्व सहा प्रवासी गंभीर जखमी झाले होते. आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आला नाही. कंपनीचा DGCA वर कंट्रोल असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. हा रिपोर्ट दाबण्यात आला. आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही. मात्र अजित दादांच्या अपघातानंतर डीजीसीएने रिपोर्ट सादर करणार असल्याचं सांगितलं. मग आधीचा रिपोर्ट दाबण्यात का आला असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला होता. हा रिपोर्ट आला असता आणि सरकारपर्यंत पोहोचला असता तर वेळीत कंपनीवर कारवाई करण्यात आली असती. तो रिपोर्ट आला असता तर अजित दादा जिवंत असते, अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली. युरोपच्या कंपनीने व्हिएसआर कंपनीवर बंदी आणली, मात्र भारतात यावर कारवाई करण्यात आली नसल्याचंही रोहित पवार म्हणाले. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com