अमोल सराफ, बुलढाणा:
Samruddhi Highway Block: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीचे काम सध्या सुरु आहे. या कामामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गावर ब्लॉक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महामार्गावरील 'हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (HTMS) अधिक सक्षम करण्यासाठी गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात ७ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, यादरम्यान वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर सुरक्षितता आणि आधुनिक वाहतूक नियोजनासाठी गॅन्ट्री उभारणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण ३५ टप्प्यांमध्ये हे काम नियोजित करण्यात आले आहे. या प्रक्रियेत महामार्गावर लोखंडी सांगाडे (गॅन्ट्री) बसवले जातात, ज्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि माहिती देणारे फलक लावले जातात.
हे काम करत असताना मुंबई आणि नागपूर या दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक दिवसातील ठराविक वेळेत ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णपणे रोखली जाईल. विशेषतः मेहकर परिसरातील प्रवासावर याचा मोठा परिणाम होणार आहे.
काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल, मात्र या एक तासाच्या काळात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने वाहनधारकांना या कालावधीत पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे किंवा प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world